आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल हनुमानगढीवर; काँग्रेस येथेच हरवली होती... कदाचित येथेच परत मिळेल!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अयोध्या- उत्तर प्रदेशातील मतदारांना आपलेसे करण्यासाठी महायात्रेवर निघालेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी अयोध्येतील हनुमानगढी मंदिरात पूजा-अर्चा केली. मात्र हनुमानगढीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रामजन्मभूमी- बाबरी मशिदीची वादग्रस्त जागा आणि रामलल्लाला भेट देणे त्यांनी टाळले. राहुलच्या या पावलाकडे २७ वर्षांनंतर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत हिंदू मतदारांना गोंजारण्यासाठीचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.

अयोध्येतील या पूजा-अर्चेनंतर राहुल गांधींनी मुस्लिम मतदारांचीही मर्जी राखण्यासाठी अयोध्येनंतर आंबेडकरनगरातील किछौठा शरीफ दर्ग्यावर चादरही चढवली. बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर २४ वर्षांनी अयोध्येत पोहोचणारे राहुल गांधी हे गांधी- नेहरू परिवारातील पहिले सदस्य आहेत. २६ वर्षांपूर्वी १९९० मध्ये राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी अयोध्येत गेले होते. तेव्हा हनुमानगढी मंदिरात पूजेचा त्यांचाही कार्यक्रम होता मात्र वेळेअभावी त्यांनी ही भेट रद्द केली होती. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी राजकीय कार्यक्रमांनिमित्त फैजाबादला अनेकदा आल्या होत्या. परंतु तेथून अवघ्या किलोमीटरवर असलेल्या अयोध्येत त्या कधीच गेल्या नाहीत. राहुल यांच्या आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अनेकदा हनुमानगढी मंदिरात दर्शन घेतले होते. आजीचा वारसा पुढे चालवत राहुल यांनी हनुमानगढी मंदिरात दर्शन घेतले आणि उत्तर प्रदेशात काँग्रेसचे सरकार पुन्हा येऊ दे अशी प्रार्थना केल्याचे मानण्यात येत आहे.

राहुल यांनी अयोध्या वादावर काहीही बोलण्याचे टाळले मात्र काँग्रेस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करेल, असे जरूर सांगितले. राजकीय निरीक्षकांना हा काँग्रेसचा सौम्य हिंदुत्वाचा अजेंडा वाटतो आहे. प्रशांत किशोर यांच्या रणनितीनुसार काँग्रेस उत्तर प्रदेशात ब्राह्मण केंद्रित राजकारणाच्या मार्गावर वाटचाल करत आहे.

पंतप्रधान व्हा : महंतांचे अाशीर्वाद
सुमारे २० मिनिटे राहुल हनुमानगढी मंदिरात थांबले होते. महंत ज्ञानदास यांच्याशी त्यांनी १५ मिनिटे बंददाराआड चर्चा केली. त्यांनी राहुलना पंतप्रधान बनून मंदिर- मशीद वाद सोडवण्याचा आशीर्वाद दिला.
बातम्या आणखी आहेत...