पाटणा- गेल्या 25 ऑगस्टला रात्री हाजीपूर रेल्वे स्टेशनहून बेपत्ता झालेली गोरखपूर-मुझफ्फरपूर पॅसेंजर अखेर तब्बल 17 दिवसांनी सापडली. बिहारमधील एक रेल्वे डिव्हिजनमधून गायब झालेली ही अख्खी रेल्वे गाडी दुसर्या डिव्हिजनमध्ये सापडल्याने रेल्वे अधिकार्यांचा जीव भांड्यात पडला आहे. या घटनेवरून रेल्वे प्रशासनामधील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 ऑगस्टला रात्री गोरखपूर-नरकटियागंज मार्गावरील घुघली स्टेशनजवळ एका मालगाडीचे नऊ डबे घसरले होते. त्यामुळे या रेल्वेमार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या मार्गावरील सर्व गाड्या देवरिया, छपरा आणि वाराणसी मार्गे वळविण्यात आल्या होती. यादरम्यान गोरखपूर-मुझफ्फरपूर पॅसेंजर या गाडीचा मार्ग बदलण्यात आला. परंतु इंटरलॉकिंगमुळे हा मार्गही काही तासांतच बंद झाला. त्यामुळे ही गाडी हाजीपूर रेल्वे स्टेशनवर रद्द करण्यात आली.
समस्तीपूर रेल्वे स्टेशनचे विभागिय व्यवस्थापक अरूण मलिक यांच्यानुसार, गोरखपूर-मुझफ्फरपूर पॅसेंजर गाडी जशी नव्या मार्गावर धावू लागली तसे प्रवाशांनी गाडीतून उतराया सुरुआत केली. या घटनेनंतर अख्खी रेल्वे गाडी बेपत्ता झाल्याची सर्वत्र चर्चा सुरु झाली. परंतु रेल्वे दुसर्या डिव्हिजनमध्ये सापडली. अधिकारी आणि कर्मचारी रेल्वेचा शोध घेत होते. अखेर 17 दिवसांनी रेल्वे सापडल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
घुघली स्टेशनजवळ घसरलेल्या मालगाडीचे डबे बाजूला केल्यानंतर गोरखपूर- मुझफ्फरपूर पॅसेंजरची रेल्वे प्रशासनाला आठवण झाली. तेव्हा अख्खी रेल्वे गाडी बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आले. हाजीपूर रेल्वे स्टेशनवर रद्द करण्यात आलेली पॅसेंजर उभी दिसली नाही. त्यामुळे इकडून तिकडून 10 डब्यांची व्यवस्था करण्यात येऊन गोरखपूर- मुझफ्फरपूरदरम्यान चालवण्यात आली. अखेर अधिकार्यांनी बेपत्ता पॅसेंजर शोधली. समस्तीपूर रेल्वे विभागात ही पॅसेंजर सापडल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.