आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rain Dusterbad Uttarakhand Aid Work, Esstianal Items Away

उत्तराखंडमधील पूरग्रस्त जिल्ह्यांत पावसामुळे अडथळे, जीवनावश्‍यक सामग्री मात्र लांब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून - उत्तराखंडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मदतकार्यावर परिणाम झाला आहे. रुद्रप्रयाग, उत्तरकाशी व चामोली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक सामग्री पोहोचवण्यासाठी सरकारने खराब वातावरणात उड्डाण करू शकणा-या हेलिकॉप्टरची मागणी केली आहे.


पूरग्रस्त जिल्ह्यात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरशिवाय साहित्य पोहोचवणे अशक्य आहे. रुद्रप्रयाग, उत्तरकाशी व चामोली जिल्ह्यात धान्याची टंचाई जाणवत आहे, अशी माहिती अधिका-यांनी दिली. हेलिकॉप्टरच्या मुद्द्यावर प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांची बैठक होत आहे. चिखल व निसरड्या रस्त्यांमुळे केदारघाटीतील ढिगा-यातून मृतदेह काढणे कठीण झाले आहे. रस्त्यांअभावी अवजड वाहने येथे आणता येत नाहीत. मदतकार्यात सहभागी कर्मचा-यांनाही पुरेसे अन्न उपलब्ध होत नसल्याने समस्येत आणखी भर पडली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी ढिगारे पडल्यामुळे 13 जणांचे पोलिस पथक रामबाडाहून गौरीकुंडला परतले आहे. सलग दोन दिवस पाऊस कोसळत असल्यामुळे अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. यामुळे केदारघाटीतील रहिवाशांमध्ये पुन्हा भीती निर्माण झाली आहे.


हवामान अंदाजासाठी नवे मॉडेल
उत्तराखंडमधील नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकार वास्तवाशी अनुरूप हवामानाचा अंदाज बांधू शकणारे मॉडेल विकसित करण्याच्या विचारात आहे. एकीकृत हिमालय हवामान योजनेनुसार हवेत नव्याने होणारे बदल टिपले जाणार आहेत. नव्या मॉडेलमध्ये उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश व सिक्कीममध्ये डॉपलर रडार बसवण्यात येणार आहेत. या भागात स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) सहकार्यातून हिमवृष्टी व हिमकडा कोसळण्याची शक्यता लक्षात येईल.