आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्डेमय रस्त्यामुळे रुग्णवाहिका न आल्याने ग्रामस्थांकडून रस्ता तयार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बागौर (भिलवाडा, राजस्थान) - पावसात अमरगड पंचायत क्षेत्रातील समरथपुरा गावातील रस्ता वाहून गेला. खड्डे एवढे पडले की मुख्य रस्त्यापासून तीन किमी अंतरापर्यंत कोणतेही वाहन जात नव्हते. हे अंतर पायी कापावे लागत होते. पंधरा दिवसांपूर्वी एका गरोदर तरुणीला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यानंतर रुग्णवाहिकेला फोन लावला. खराब रस्त्याचे कारण देत जवळपास १० चालकांनी गावात येण्यास नकार दिला. अखेर जोखीम पत्करून दाईकडून प्रसूती करणे भाग पडले. बुधवारी ग्रामस्थांनी बैठक बोलावली आणि श्रमदानातून रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला. परिणामी सात तासांत दीड किमी रस्ता तयार झाला.
समरथपुराचे रतनलाल यांनी सांगितले की, मुख्य मार्गाला जोडणाऱ्या गावाच्या तीन किमी रस्त्यावर खोल खड्डे पडले होते. आमदाराने रस्त्याची मागणी केली. सर्व स्तरांवर प्रशासनाला समस्या सांगितली. कोणताही नेता रस्ता बांधकामास तयार झाला नाही, केवळ आश्वासनेच मिळत गेली. यानंतर ग्रामस्थांनी सामूहिक निर्णय घेऊन स्वत:हून रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला. बघता-बघता २५ हजार रुपये जमा झाले. ग्रामस्थांनी श्रमदान केले. ४ ट्रॅक्टर-ट्रॉली, २ जेसीबी व अन्य साधने एकत्र केली. पथक स्थापन करून सकाळी ११ वाजता कामास सुरुवात झाली. सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत जवळपास दीड किमी रस्ता पूर्ण झाला होता. हा मुरूम, खडीने रस्ता तयार केला जात असून त्यावर एक लाख रुपये खर्च होतील. यामध्ये ग्रामस्थांनी श्रमदान केले. अर्धे काम झाले असून उर्वरित लवकरच पूर्ण होईल. दुसरीकडे उपजिल्हाधिकारी देवीसिंह यांनी सांगितले की गावात रस्ता केल्याबाबतची माहिती माझ्याकडे नाही.
मुले शाळेला पायी जातात
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, आम्ही मुख्य रस्त्यापर्यंत जाऊ शकतो. मात्र, मुलांना दररोज पायी जावे लागते. हे आम्हाला पाहवत नाही. गावात कोणतेही वाहन येत नाही.
शौचालय कसे तयार करावे? : बैठकीस उपस्थित आर्थिक सहकार्य केले व्यक्तींनी सांगितले की, गावात शौचालय बांधकामाचे कामही रखडले आहे. कोणतेही वाहन गावात येत नाही. बांधकाम साहित्य गावात आणणार कसे? यामुळे हे काम बंद आहे.
पैशाची कमतरता : अमरगडच्या सरपंच रतनीदेवी सुथार म्हणाल्या, समरथपुरामध्ये ग्रामपंचायतीने रस्त्यावर मुरूम टाकला होता. पंचायतीकडे पैसे नाहीत. अधिकाऱ्यांशी बोलून आर्थिक तरतुदीचा प्रस्ताव पाठवणार आहोत.
बातम्या आणखी आहेत...