छपरा/ पाटणा/ नवी दिल्ली - बिहारच्या छपरामध्ये राजधानी एक्स्प्रेसचे इंजिनसह 11 डबे रुळावरून घसरल्यामुळे पाच प्रवासी ठार तर 63 जखमी झाले. जखमींमध्ये काही जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.
मंगळवारी रात्री राजधानी एक्स्प्रेस दिल्लीहून आसामच्या दिब्रुगडकडे जात होती. यादरम्यान रात्री सव्वादोन वाजता रेल्वे इंजिनसह 11 डबे रुळावरून घसरले. अपघात एवढा भीषण होता की काही डबे बाजूच्या शेतात जाऊन पडले. अपघातामुळे 25 रेल्वे रद्द करण्यात आल्या तर काहींचे मार्ग बदलण्यात आले. रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी नक्षली घातपाताच्या शक्यतेचा इन्कार केला नाही. मात्र, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी इतक्यात निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनीही नक्षली हल्ल्याची शक्यता नाकारली.
फिश प्लेट उघडी
रेल्वे बोर्डाचे चेअरमन अरुणेंद्र कुमार यांनी केलेल्या प्राथमिक तपासात नक्षली हल्ल्याची शक्यता वर्तविली. हाजीपूरच्या विभागीय व्यवस्थापकांनी रेल्वे रुळावरील काही फिश प्लेट उघड्या असल्याची माहिती दिली. या प्लेट आपोआप उघडत नाहीत. गुप्तचर संस्थांनी नक्षली हल्ल्याची शक्यता आधीपासूनच वर्तविली होती. राज्य सरकारला यासंदर्भात माहिती देण्यात आली होती.
पापा प्लीज मला वाचवा...
सकाळी साडेसात वाजता पाटणा मेडिकल कॉलेज व रुग्णालयातील इमर्जन्सी वॉर्डाजवळ पहिली रुग्णवाहिका पोहोचली. रुग्णवाहिकेतून एकापाठोपाठ एक 14 जखमींना बाहेर काढले. शस्त्रक्रिया कक्षात एका मुलीच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. पापा.... खूप दुखतय.प्लीज मला वाचवा! पोटाच्या गंभीर दुखापतीमुळे गंभीर वेदना होत आहेत. पायही मोडला आहे. जवळ उभे असलेले वडील संजीव बेरी मुलीला धीर देत आहेत. सर्व काही ठीक होईल. संजीव यांची पत्नी भारती यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. संजीव पंजाबच्या फिरोजपूरचे रहिवासी असून ते जलपायगुडीला जात होते. अशातच 13 वर्षाची मौली आई-वडिलांचा शोध घेत आहे. डोक्याला दुखापत झाल्यामुळे पट्टी बांधली आहे. डॉक्टर, नर्स, आदी दिसेल त्यांना आईवडिलांबाबत विचारणा करत आहे. मात्र, दुर्दैवाने तिची आई नीलम आणि वडील पवन कुमार धवन यांचा अपघात मृत्यू झालेला आहे. सर्वजण दार्जिलिंगच्या सहलीवर जात होते.