आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव यांच्या मारेकर्‍यांची सुटका; तामिळनाडूत आनंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या निकालानंतर बुधवारी तामिळनाडू सरकारने सात दोषींना मुक्त करण्याचा निर्णय घेऊन तत्काळ प्रतिसाद दिला. जयललिता यांच्या या निर्णयाचे विविध पक्षांच्या नेत्यांनी मतभेद बाजूला सारत स्वागत केले आहे. जयललिता यांचे कट्टर विरोधक द्रमुकप्रमुख एम. करुणानिधी यांनीही त्यांची प्रशंसा केली आहे.
हा वेगात घेतलेला निर्णय नाही. 2011 मध्ये मी सुटकेबाबत मत व्यक्त केल्यानंतर त्यांनी प्रस्ताव मान्य केला नाही, तरीही त्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो, असे करुणानिधी यांनी सांगितले. हे मानतावादी पाऊल उचलले आहे. एमडीएमकेचे प्रमुख वायको यांनीही करुणानिधी यांच्या मताची री ओढली.
बेकायदा निर्णय
असे असले तरी सरकारच्या निर्णयाविरोधातही सूर उमटत आहेत. भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय बेकायदा असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बी.एस. गनदेसिकन यांनी सरकारचा निर्णय राजकारणाने प्रेरित असल्याचे सांगितले.
सीएम अम्मांचे आभार : पेरारिवलनची आई
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी पेरारिवलनची आई अरुपुथाने सरकारच्या निर्णयावर आनंद व्यक्त करत मुख्यमंत्री जयललिता अम्मांचे आभारी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. काल मला थोडासा आनंद झाला. मात्र, आजच्या निर्णयामुळे मला आणखी आनंद झाला. जयललिता यांनी एका आईच्या वेदना जाणल्या. अरुपुथा यांनी बुधवारी जयललिता यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.