आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajnath Singh Hits Back Hurriyat Leaders Says We Are Fully Cooperating To Restore Normalcy In Kashmir

लोकशाहीवर विश्वासच नाही हे फुटीरतावाद्यांनी दाखवले; राजनाथसिंह यांची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर/जम्मू- काश्मीरमधील अस्वस्थता संपुष्टात आणण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्याचा दोन दिवसांचा दौरा केला, पण त्यातून कुठलेही फलित निघाले नाही. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सकारात्मक फलित निघेल, अशी आशा व्यक्त करतानाच शिष्टमंडळाशी चर्चेला नकार देणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांवर टीका केली. फुटीरतावादी नेत्यांचे वर्तन ‘काश्मिरियत, जम्हुरियत (लोकशाही) आणि इन्सानियत’ला धरून नाही, अशी टिप्पणी राजनाथ यांनी केली.

गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या नेतृत्वाखालील या सर्वपक्षीय शिष्टमंडळात २० पक्षांच्या २६ खासदारांचा समावेश होता. काही खासदारांनी हुरियत कॉन्फरन्स या फुटीरतावादी संघटनेच्या काही नेत्यांची भेट घेण्याचा प्रयत्न रविवारी केला होता. पण या नेत्यांनी त्यांना प्रतिसादच दिला नाही. त्यामुळे राजनाथसिंह यांनी या नेत्यांवर टीकेची झोड उठवली.

राजनाथसिंह म्हणाले की, मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी हुरियत नेत्यांना चर्चेचे निमंत्रण पाठवले होते. शिष्टमंडळातील काही खासदारांनी रविवारी हुरियत नेत्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी कुठलेच उत्तर दिले नाही. तेथून परतलेल्या खासदारांनी जे सांगितले त्यावरून हुरियतच्या नेत्यांचे वर्तन ‘काश्मिरियत’ला धरून नव्हते हे मात्र स्पष्ट झाले. जेव्हा कोणी चर्चेला येते आणि त्याला नकार दिला जातो, त्याला जम्हुरियत (लोकशाही) म्हणता येत नाही.दौरा निष्फळ ठरला का, या प्रश्नाला राजनाथसिंह यांनी नकारार्थी उत्तर दिले. ते म्हणाले की, शिष्टमंडळाची काही व्यक्ती आणि संघटना यांच्याशी चांगली चर्चा झाली. आता शिष्टमंडळातील सदस्य दिल्लीत भेटतील.

पनून काश्मीरचाही बहिष्कार
काश्मिरी पंडितांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पनून काश्मीर या संघटनेनेही सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या चर्चेच्या प्रस्तावाला प्रतिसाद दिला नाही. संघटनेचे संयोजक अग्नीश खेर म्हणाले की, आमच्या संघटनेला भेटीसाठी फक्त आठ मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. या आठ मिनिटांत आम्ही आमची बाजू कशी मांडू शकलो असतो? खासदारांनी फुटीरवाद्यांच्या भेटीसाठी अक्षरश: याचना केली , अशी टीका त्यांनी केली.

३० शिष्टमंडळांशी केली चर्चा
खासदारांच्या शिष्टमंडळाने राजकीय पक्ष, सिव्हिल सोसायटी, विद्यापीठातील शिक्षक, फळ उत्पादक, विद्यार्थी आणि बुद्धिवंत यांच्याशी संबंधित ३० शिष्टमंडळांशी चर्चा केली. त्यांनी आपली मते सविस्तरपणे शिष्टमंडळासमोरे मांडली. परिस्थितीत सुधारणा व्हायला हवी, असे मत सर्वांनीच व्यक्त केले. राज्यपाल, मुख्यमंत्री, सरकारी अधिकाऱ्यांशीही चर्चा झाली. लवकरच राज्यातील स्थितीत सुधारणा होईल, असा विश्वास आम्हाला वाटतो, असे राजनाथसिंह यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीर भारताचाच अविभाज्य भाग
जम्मू आणि काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग राहील, हे राजनाथसिंह यांनी दौऱ्याच्या शेवटी पुन्हा ठासून सांगितले. ते म्हणाले की, जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि यापुढेही राहील. काश्मीर प्रश्नी भारतातील कोणाशीही चर्चा करण्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत. पण कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तानशी चर्चा केली जाणार नाही.
बातम्या आणखी आहेत...