आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajsthan Assembly Election: Record Break Voting In Rajsthan

राजस्थान विधानसभा निवडणूक: राजस्थानमध्ये ‘रेकॉर्डब्रेक’ मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - किरकोळ हिंसाचाराच्या घटना वगळता रविवारी राजस्थानमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत सुमारे 75 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. ही निवडणूक मुख्यमंत्री अशोक गहलोत, विरोधी पक्षनेत्या वसुंधराराजे यांचे राजकीय भवितव्य ठरवणार आहे. 8 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
राजस्थानमध्ये मतदान प्रक्रियेत नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. त्यामुळे सायंकाळपर्यंत 74.38 टक्के मतदानाची नोंद झाली होती. निवडणूक रिंगणात 2 हजार 87 उमेदवार आपले भाग्य आजमावत आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांना काही मतदारसंघ परिसरात हवेत गोळीबार करावा लागला. काही भागांत मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी रोखला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. सलीमपूर, दौसा जिल्ह्यातील अलवार आणि भरतपूरमध्ये समाजकंटकांनी मतदान प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी हवेत गोळीबार करून रोखले. विविध घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही. त्याशिवाय राज्यात मतदान केंद्राच्या 200 मीटर क्षेत्रात कोणताही हिंसाचार झाला नाही, अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक नवदीप सिंह यांनी दिली. चुरू मतदारसंघाचे बसपा उमेदवार जगदीश मेघवाल यांचे निधन झाल्यामुळे तेथील मतदान पुढे ढकलण्यात आले आहे. त्यांचे 13 डिसेंबरला निधन झाले. निवडणुकीत काँग्रेस व भाजपने प्रत्येकी 200 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. बसपाचे 195 तर अपक्षांची संख्या 758 आहे.
सर्वाधिक टक्केवारी
राजस्थानमध्ये आतापर्यंत राजकीय इतिहासात विधानसभेसाठी मिळालेला मतांचा कौल सर्वात अधिक असल्याचे सांगण्यात आले. सकाळपासूनच मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. पहिल्या सत्रात मतांची टक्केवारी 20 वर पोहोचली होती. दुपारपर्यंत हा आकडा पन्नास टक्क्यांहून अधिक झाला होता. 2003 निवडणुकीत राज्यात 68.18 टक्के तर 2008 मध्ये 66.49 टक्के मतदान झाले होते.
व्हॅन पेटवली : सिकर जिल्ह्यातील फतेहपूरमध्ये काही जणांनी पिकअप व्हॅनला आग लावली, परंतु त्यात कोणी जखमी झाले नाही. भरतपूरमध्ये मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रकार रोखण्यात आल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचा दावा पोलिसांनी केला.
जोधपूरमध्ये गहलोत यांचे मतदान : मुख्यमंत्री गहलोत, त्यांची पत्नी, स्नूषा यांनी जोधपूरमधील जैन उच्च् प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्रावर आपला हक्क बजावला. गहलोत जोधपूर जिल्ह्यातील सारदापूर आणि झालरापट्टन मतदारसंघातून आपले नशीब आजमावत आहेत.
बहिष्कार : राजस्थानातील दुग विधानसभा मतदारसंघात नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला. झालावार जिल्ह्यातील हा मतदारसंघ आहे.
प्रचार थंडावल्यानंतर राजकीय नेते गायब,फॉलोअर्स सक्रिय
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रविवारपर्यंत चार राज्यांत मतदान पार पडले आहे. दिल्लीमध्ये बुधवारी (दि.4) मतदान होत आहे. प्रचार आणि मतदान संपल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून निवडणूक मैदान व सोशल मीडियावर जोरजोरात बोलणा-या नेत्यांचे बोल शांत झाले आहेत. निवडणूक काळात नेते मंडळी दररोज नवनवी आश्वासने घेऊन मतदारांसमोर येत होती. यावर त्यांचे समर्थक व विरोधक आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देत होते. फेसबुक आणि ट्विटरवर लाखोंच्या संख्येत कॉमेंट्स, फोटो आणि कार्टून शेअर करत होते. मात्र, आता तसे होणार नाही. नेत्यांची आश्वासने आणि दावे गायब झाले आहेत. त्यांचे फॉलोअर्स आपापल्या पद्धतीने बाजू सांभाळत आहेत. दिल्लीतील प्रचार अंतिम टप्प्यात आहे. शनिवारी काँग्रेस, भाजपसह आम आदमी पार्टीचे सर्व मोठे नेते यावर सक्रिय झाल्याचे दिसतात. आम आदमी पार्टीचे कुमार विश्वास यांनी कामात व्यग्र असल्याचे सांगत फॉलोअर्सना ट्विटरवर प्रश्न विचारण्याचे आवाहन केले आहे.