आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘व्होट कटवा’ नितीश यांच्यामुळे सपाला मतविभाजनाचा लाभ, शहा यांचे जनतेला आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी- बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे ‘व्होट कटवा’ अर्थात मतांचे विभाजन करून समाजवादी पार्टीला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासारख्या व्यक्तींपासून सावध राहा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले. ते शनिवारी एनडीएच्या सहकारी पक्ष अपना दलच्या प्रचारसभेत बोलत होते.

नितीशकुमार उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचार करत फिरत आहेत. परंतु त्यांचा हा प्रचार सत्ताधारी समाजवादी पार्टीच्या फायद्यासाठी आहे. मतांचे विभाजन करून सत्ताधारी सपाला पुन्हा सत्ता मिळवून देण्यासाठी हा खटाटोप चालला आहे, असा हल्लाबोल शहा यांनी केला. बिहारमध्ये गुन्हेगारीच्या घटनांना ऊत आला आहे. तेथील परिस्थिती सांभाळण्यात नितीशकुमार यांना अद्यापही यश आलेले नाही. घरातील सोडून बाहेर लक्ष देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. स्वत:च्या राज्यात काही जमेना, मग उत्तर प्रदेशात ते काय करत आहेत ? खरे तर यूपीच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला एकाही जागी विजय मिळणार नाही, याची नितीश यांना जाणीव आहे. परंतु तरीही ते राज्यात प्रचार मोहीम राबवत आहेत. त्यांच्यासारख्या लोकांपासून जनतेने सावध राहिले पाहिजे. ते मतविभाजन (व्होट कटवा) करतात. त्यांची प्रचार मोहीम केवळ मतांचे विभाजन करण्यासाठी आहे. त्यामागे अन्य काहीही हेतू दिसत नाही. शहा यांनी अखिलेश यांच्यावरही टीका केली. राज्यात काका-पुतण्या यांच्यातील सुंदाेपसुंदी सुरू आहे. याची खबर जनतेला नाही, असे अखिलेश यांना वाटत असेल. परंतु तसे नाही.

अपना दलसोबत युती
उत्तरप्रदेशात भाजपच्या नेतृत्वाखाली रालोआमध्ये अपना दल हा घटक पक्ष आहे. अपना दलचे संस्थापक सोनेलाल पटेल यांच्या ६७ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वाभिमान सभा आयोजित करण्यात आली होती. कुरमी हा मागासवर्गीय समाज असून अपना दल या समुदायाचे नेतृत्व करते.

सपामध्ये सगळ्या गुन्हेगारांचा भरणा
अखिलेश, तुमच्या पक्षात तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांचा भरणा आहे. मुख्तार (अन्सारी), अफझल (अन्सारी), अतीक (अहमद), आझम (खान) यासारखी कितीतरी नावे सांगता येतील. तुम्ही या सर्व नेत्यांना पक्षाबाहेर फेकण्याचे ठरवले तरी मग पक्षात कोणीही शिल्लक राहणार नाही, असा टोलाही शहा यांनी लगावला.
बातम्या आणखी आहेत...