आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवेच्या नावाखाली कमाईची 10% रक्कम राम रहीमला, बाबाची दरमहा 922 कोटींची कमाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत- बलात्कारी गुरमीत राम रहीम याने डेरा सच्चा सौदाला खासगी कमाईचा मार्ग बनवला होता. तो विना बँक खाते, व्यवहार न करता आणि कोणतीही नोंद न ठेवता दरमहा सुमारे ९२२ कोटी रुपयांची वसुली करत होता. हा पैसा हरियाणा, पंजाब आणि राजस्थानातील डेराच्या ९० लाख स्थायी सदस्यांकडून सेवेच्या नावाखाली वसूल केला जात असे. या सदस्यांत २५ हजार पदाधिकारी होते. एका पदाधिकाऱ्याने सांगितले, पदाधिकारी व स्थायी सदस्य होण्यासाठी कमाईचा १० वा हिस्सा बाबाला द्यावा लागत होता.  एक लाख रुपये उत्पन्न असलेले पदाधिकारी व १० हजार उत्पन्न असलेले स्थायी सदस्य होण्यास पात्र ठरत. ज्यांना पैसे देणे शक्य नव्हते त्यांना श्रमदान करावे लागत होते. 

खरेदीदार, साहित्य आणि किंमत डेराच ठरवत असे ६१ लोकांवर जिल्ह्याचा भार  
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ५ पदाधिकाऱ्यांसह ६१ सदस्यांची समिती होती. जिल्हाप्रमुख, महामंत्री, कोशाध्यक्ष, सचिव आणि सहसचिव अशी पदे होती. याशिवाय दोन पथके होती. एकात ११ तर दुसऱ्या पथकात ४५ सदस्य होते. पथके डेराचा प्रचार व सदस्य नोंदणी करत, तर पदाधिकारी सेवेसाठी दान देत होते. 

‘नाम चर्चा घरां’तून आठवड्याला पैसे 
हरियाणा, पंजाब आणि राजस्थानातील जिल्ह्यात ३०० हून अधिक “नाम चर्चा घर’ आहेत. येथे दर रविवारी बाबाच्या नावाचा जप होत असे. यादरम्यान डेराप्रेमी  १०,२०, ५० रुपये दान करत होते. येथे डेराप्रेमींना जास्तीत जास्त लोक आणण्याबद्दल सांगण्यात येत असे.  

१ हजार रुपयांत भाजीचा एक तुकडा  
ऑर्गेनिक फळ आणि भाज्यांची डेराप्रेमींना विक्री करण्यात येत असे. गुरमीत शेतात ट्रॅक्टर चालवताना, कुदळ मारताना दाखवण्यात येत असे. यामुळे बाजारात १० ते २० रुपये किलो दराने मिळणाऱ्या  भाज्या येथे ५०० ते १ हजार रुपये नगावर विक्री हाेत.  

कमाईचे तीन मुख्य मार्ग  

११ हजार आणि ५१०० रुपयांत एमएसजी किट 
पदाधिकारी व स्थायी सदस्यांना दरमहा डेरातून एमएसजीची एक किट दिली जात होती. पदाधिकाऱ्यांसाठी ११ हजार व स्थायी सदस्यांसाठी ५१०० रुपये असा दर होता. या लोकांना दरमहा इतकी रक्कम द्यावीच लागत होती. याशिवाय बाबांची इतर उत्पादने विक्रीचा दबावही असायचा. ही किट डेरातच पॅकबंद केली जायची. यात डाळी, तांदूळ आणि सरसोचे तेल इ.खाद्यपदार्थ असत.  

कपडे, वाहनांचा लिलाव लाखोंमध्ये  
डेरामध्ये सोहळ्याच्या वेळी बाबाने वापरलेले कपडे, बूट, खुर्ची आणि त्यांच्या वाहनांचा लिलाव होत असे. आत्महत्या केलेल्या डेराप्रेमी सोमबीरची पत्नी चित्रा यांनी सांगितले, बाबाचा चमकणारा पोशाख सोमबीरने ६ लाखांत विकत घेतला होता. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरमीत राम रहीम दर सोहळ्यात लिलावातून दहा कोटींची कमाई करत होता.  

डेरामध्ये फूडिंग-लाॅजिंगची अत्याधुनिक यंत्रणा  
संगतनंतर डेरामध्ये एकदा दाल व रोटीचा प्रसाद दिला जात होता. यानंतर पैसे घेऊन टोकन दिले जायचे. त्यावर भोजन मिळत होते. गरीब डेराप्रेमी डेरामध्ये जमिनीवर चादर टाकून झोपत असत, तर पैसेवाल्या भक्तांसाठी राहण्याची खास व्यवस्था होती. मागणीनुसार खोल्यांचा दर कमी-जास्त होत असे. एक हजारापासून ५० हजारांची रूम, बंगले तेथे मिळत होते. डेराच्या नियमानुसार प्रतिबंधित वस्तू तेथे उपलब्ध होत्या.

खोदकाम झाले नाही,  तीन दिवसांत मोहीम संपली
डेराच्या जमिनीत मानवी सापळे जमिनीत पुरलेले असल्याचा आरोप होऊनही बाग-बगिच्याचे खोदकाम न करताच सर्च ऑपरेशन रविवारी संपले. आता कोर्ट कमिशनर एस. के. पवार उच्च न्यायालयात अहवाल सादर करतील.

जनसंपर्क विभागाचे उपसंचालक सतीश मेहरा यांनी सांगितले, सर्च ऑपरेशन शनिवारी सायंकाळी ९९ टक्के पूर्ण झाले होते. खोदकामाबाबत विचारले असता ते म्हणाले, यासंदर्भात कोर्ट कमिशनरच सांगू शकतील. रविवारी दुपारी कोर्ट कमिशनर डेरामध्येे गेले. दीड तासानंतर ते परतले. यावेळी एका महिला अधिकाऱ्यांस अपघात झाला होता. ताफ्याच्या आधी एक रुग्णवाहिका डेरातून बाहेर आली. ती कोठे गेली? त्यात कोण होते? याची माहिती देण्यात आली नाही. 
बातम्या आणखी आहेत...