आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ram Vilas Paswan's LJP To Tie Up With BJP News In Marathi

भाजपला बळ देण्यास पासवान उत्सुक;बिहारमध्ये आघाडीची घोषणा लवकरच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - बिहारमधील राजकीय समीकरणे आगामी काळात बदलत आहेत. इतके दिवस राजद-काँग्रेस आघाडीत सहभागी होऊ पाहणारे रामविलास पासवान यांनी भाजपशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच औपचारिक घोषणा होईल.

लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस बिहारमध्ये आघाडी करणार आहे. यात सहभागी होऊन पासवान काही प्रमाणात राजकीय लाभ पदरात पाडून घेऊ इच्छित असले तरी या आघाडीच्या घोषणेला होत असलेल्या विलंबास कंटाळून आता त्यांनी भाजपला बळ देण्याचे ठरवले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा घटक पक्ष म्हणून पासवान यांनी यापूर्वी सत्ताही भोगलेली आहे. त्यामुळे भाजपशी आघाडी त्यांना नवी नाही. एनडीए सरकारच्या काळात गुजरात दंगलींनंतर पासवान यांनी एनडीएला सोडचिठ्ठी दिली होती. आता ते पुन्हा एनडीएमध्ये सहभागी होतील.

मोदींची केली होती स्तुती : काही दिवसांपूर्वी पासवान यांनी देशात नरेंद्र मोदींची लाट असल्याचे वक्तव्य केल्यानंतर धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणार्‍या सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. विशेषत: लालुप्रसाद यादव यांना चांगलाच धक्का बसला होता. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या विरोधात पासवान यांना आपला भरवशाचा सहकारी मानणार्‍या लालूंच्या पारड्यात आता पासवान यांची मते पडणार नाहीत.

उदित राज भाजपमध्ये
बिहारमध्ये पासवान यांना आघाडीत घेऊन दलित मतदान पारड्यात पाडू पाहणार्‍या भाजपला उत्तर प्रदेशातही उदित राज यांच्या रूपाने दलित शक्ती मिळणार आहे. उदित राज उत्तर प्रदेशात प्रभावी दलित नेते मानले जातात. सोमवारी राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत राज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.