आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्काराचा आरोप असलेल्या राजस्थानच्या पुरवठा मंत्र्याचा राजीनामा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - एका 35 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा ठपका असलेले राजस्थानचे बाबूलाल नागर यांनी गुरुवारी अखेर पदाचा राजीनामा दिला. या महिलेस घरी बोलावून नागर यांनी तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप आहे.
नागर (53) यांच्याकडे राज्याची अन्न व नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी आहे. अत्याचाराचा आरोप झाल्यामुळे नैतिक पातळीवर पदाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भातील चौकशी नि:पक्ष पद्धतीने व्हावी, असे मला वाटते.

त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे, असे नागर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. माझ्या हस्ताक्षरातील राजीनामा मी मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. त्या अगोदर खूप विचार केला. काही व्यक्तींचा सल्ला घेतला, त्यानंतर हा निर्णय घेतला. त्यासाठी मला कोणाकडूनही दबाव आला नव्हता. दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गहलोत सध्या बरमार येथील एका समारंभात सहभागी होण्यासाठी गेले आहेत. नागर यांच्या राजीनाम्याची आम्हाला काहीही कल्पना नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातील प्रसिद्धी सल्लागार मोहंमद यासीन यांनी सांगितले. दरम्यान, कोणीही कायद्याच्या वर नाही. कायदा आपले काम करील. आसाराम प्रकरणातही आपण हे सांगितले होते, असे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी बुधवारी स्पष्ट केले होते.


गुन्हा दाखल
11 सप्टेंबर रोजी नागर यांनी सदर महिलेस नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिला आपल्या घरी बोलावून अत्याचार केला, असा आरोप आहे. नागर यांच्याविरुद्ध सोडाला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


तपास सीआयडीकडे
अशोक गहलोत सरकारमधील मंत्र्यावर अत्याचाराचा आरोप झाल्याने सरकारची बदनामी झाली आहे. आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.