आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जजची तडजोड मान्य, म्हणजे आयुष्यभर अत्याचार सोसावा लागला असता...\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - तिला माझ्यापाशी बरेच मन मोकळे करायचे होते. सात वर्षांपूर्वी एका बलात्काराला ती बळी पडली होती. मद्रास उच्च न्यायालयाने खटल्यात तडजोड सुचवत निकाल दिला. मात्र, तिने तडजोड धुडकावून लावली आहे. न्यायाधीशांनी दिलेला हा निकाल सहज मान्य केला असता तर आयुष्यभर बलात्काराच्या मरणयातना पुन्हा सोसाव्या लागल्या असत्या... असे बोल कानी पडले तेव्हा मन सुन्न झाले. मला न्यायाधीशांकडे घेऊन चला, मला काय पाहिजे ते मी सांगेन, असे ती अत्याचारग्रस्त महिला अगदी पोटतिडकीने सांगत होती.

ती अखंड बोलत होती. मात्र, मला तिची भाषा समजत नव्हती. वाटले, तामिळ शिकण्याची शक्ती अवगत असती तर बरे झाले असते. नथिंग... इंग्लिश. एवढेच काय ते माझे तिला समजले. यानंतर ७५ वर्षीय जयलक्ष्मी यांनी आमच्यातील संवादसेतू बांधला. जयलक्ष्मी अम्मा ५०० किमी अंतरावरून तिला चेन्नईला घेऊन आल्या. येथील एका सुधारगृहात ती दहा दिवसांपासून राहत आहे. इथे येण्याला तिच्या सात वर्षांच्या संघर्षाची पार्श्वभूमी आहे.

२००८ ची घटना आहे. तीन दिवसांनंतर दहावीची परीक्षा होती. गावात ितचे आणि व्ही. मोहनचे घर एकाच भागात होते. मोहनने तिला घरी बोलावून गुंगीचे औषध मिसळलेले कोल्ड्रिंक्स पाजले आणि अत्याचार केला. त्यानंतर त्याने छायाचित्र काढून वेळोवेळी धमकावले आणि पुन्हा पुन्हा त्याच कृतीसाठी भाग पाडले. अशात ती गरोदर राहिली. गर्भपात करण्यासाठी त्याने दबाव टाकला, परंतु ितने त्यास नकार दिला. घडल्या प्रकाराबाबत मावशीने तिला पोलिसांकडे नेले. खटला सुरू झाला. डीएनए चाचणी झाली. मोहननेच तिच्यावर बलात्कार केल्याचे उघड झाले. २०१४ मध्येच मोहनला तुरुंगवास झाला आणि त्यानंतर न्यायाधीशांनी तडजोडीचा निकाल जाहीर केला. यासंदर्भात ती म्हणाली, गेल्या सात वर्षांपासून माझ्याच घरी मी कैद्यासारखी बंदिस्त होते. त्याउलट न्यायाधीशांनी नराधमाला सोडण्याचे आदेश दिले. निकाल ऐकवताना तो, मी, माझे वकील हजर नव्हतो. अशा स्थितीत न्यायाधीश निकाल कसा देऊ शकतात? डीएनए अहवाल येईपर्यंत मी दररोज रडत होते. मात्र, त्या दिवसानंतर मी कधीच अश्रू गाळले नाहीत. आता मी त्याला जन्मठेप दिल्याशिवाय राहणार नाही.

ती जे काही सांगत होती ते जयलक्ष्मी अम्मा तुकडे तुकडे करून सांगत होती. मध्येच कोर्टाची कागदपत्रे दाखवत होती. काही तामिळ, तर काही इंग्रजीतील. बँकेत खाते उघडण्यासाठी तिने स्वत:चा व मुलीचा पासपोर्ट साइज फोटो काढला आहे. फाइलमधून फोटो काढून चिमुरडीने माझ्या हातावर ठेवले. गेल्या सात वर्षांतील कदाचित तिचा हा पहिला फोटो असावा. काही दिवसांपूर्वी गावाच्या शाळेतील शाळा सोडल्याचा दाखला तिच्याकडे चेन्नईत आणला. आता आम्ही मायलेकी सोबत शिकू, असा विश्वास तिने व्यक्त केला.

मुलगी तिसरी अाणि मी दहावीची परीक्षा देईन. मुलीने याच आठवड्यात सहावा वाढदिवस साजरा केला. आईने तिचे शिवशक्ती नाव ठेवले आहे. तिला शिकवण्याची आईची खूप इच्छा आहे. मोहनने तुरुंगात जाण्याआधी पदवी शिक्षण पूर्ण केले होते. मोहनने बाळाचा स्वीकार करावा यासाठी मी तिच्याकडे भीक मागत होते. मात्र, एका बलात्काऱ्यासोबत मुलीने राहावे, असे आता तिला वाटत नाही. मुलीने माझे वडील आहेत का, असे विचारले तर तिला वडीलच नाहीत असे सांगेन. मी एकटीच तिच्या पालकत्वासाठी पुरेशी आहे. केवळ तुरुंगातून बाहेर येण्यासाठी तो तडजोडीच्या गोष्टी करत आहे, अन्यथा तो या मुलीलाही स्वीकारण्यास तयार नव्हता.
तीही वडिलांची लाडकी लेक होती. मात्र, या घटनेचा त्यांना एवढा धक्का बसला की त्यांनी अन्नपाणी वर्ज्य केले. नाेकरी, कामधंदा बंद. ते घरातून बाहेरही पडत नव्हते. याच अवस्थेत त्यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. भाऊ वाणिज्य पदवीधर आहे. मात्र, गावातील निंदानालस्तीमुळे तोही घराबाहेर पडत नाही. एखादा दुसरा दिवस हमालीचे काम करतो. मावशीनेच त्याचा सांभाळ केला आहे.

चेन्नईत सध्या ती चोरून-लपून काम करते. त्याच्याशी तडजोड केली असती तर पैसा मिळाला असता, मात्र सन्मान नाही. पहिल्यांदा कोणताही वकील तयार नव्हता, आता मात्र शहरातील प्रत्येक मोठा वकील खटला लढू इच्छित आहे. प्रसिद्ध महिला वकीलही संपर्कात आहे. मद्रास उच्च न्यायालयातील १०३ वकिलांनी निकाल देणारे न्यायमूर्ती देवदास यांना काढून टाकण्याची मागणी केली आहे. बलात्काऱ्यासोबत तडजोडीचा निकाल देऊन चांगले कार्य करत असल्याचे न्यायमूर्तींना वाटत होते. प्रसारमाध्यमांना निकालाची प्रत पाठवण्यात आली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी निकालावर टीका झाल्यावर अशाच एका खटल्यात आरोपीला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी दिला अजब निकाल...
दोषी एलिजिबल बॅचलर, पीडितेने त्याच्याशी लग्न करावे
१८ जून रोजी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. देवदास यांनी दिलेल्या निकालात म्हटले की, फिर्यादी आई झाली आहे. मात्र, कोणाची पत्नी झाली नाही. अर्जदार एलिजिबल बॅचलर म्हणजे विवाहायोग्य आहे. त्याने ५० दिवसांपेक्षा जास्त तुरुंगवास भोगला आहे आणि त्याची पीडितेशी लग्न करण्याची इच्छा आहे. त्यामुळे या खटल्याची अानंददायक अखेर होत आहे.
{दोषीला तुरुंगात ठेवणे आणि त्याला तडजोडीसाठी बोलावण्याचा उपयोग नाही. चर्चेदरम्यान आपल्या भावना मोकळेपणाने मांडण्यासाठी त्याला स्वतंत्र व्यक्तीच्या रूपात सहभागी झाले पाहिजे. ...अखेर इच्छा तिथे मार्ग.

{१ जुलै रोजी म. प्र. सरकार विरुद्ध मदनलाल प्रकरणात सर्वोच्च न्यायालय म्हणाले, बलात्कार प्रकरणात तडजोडीचा पर्याय होऊ शकत नाही. मद्रास उच्च न्यायालयासाठी हा कडक संदेश मानला गेला. यानंतर उच्च न्यायालयाने निकाल परत घेतला आणि दोषीचा जामीन रद्द केला.
बातम्या आणखी आहेत...