आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा ट्रस्टचे तुम्हीच खरे वारसदार, स्थापना दिनाच्या निमित्ताने रतन टाटांचे कर्मचाऱ्यांना पत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमशेदपूर - टाटा ट्रस्टचे उत्तराधिकारी आणि रक्षक म्हणून कर्मचाऱ्यांवर मोठी जबाबदारी असल्याचे भावनात्मक आवाहन टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी  केले. रतन टाटा यांनी या लोककल्याणकारी संस्थेचा १२५ वा स्थापना दिन आणि टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी नौसरवानजी टाटा यांच्या १७८ व्या जयंतीचे औचित्य साधून कर्मचाऱ्यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे.
 
या पत्रात त्यांनी टाटांचा वारसा जतन करण्याची कर्मचाऱ्यांवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे, असे म्हटले. समूहातील प्रत्येकाने व्यवसायापलीकडे जाऊन विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. 

रतन टाटा यांनी पत्रात म्हटले : तुमचा उत्साह आणि निष्ठेने केलेल्या कठोर परिश्रमामुळेच आपला समूह इतक्या उच्च पातळीवर गेला. तुमच्यामुळेच आम्हाला समाज आणि देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. समाजात बदल व्हावा, असा विश्वास ट्रस्टला आहे. रतन टाटा यांनी पत्रात म्हटले आहे की, टाटा सन्समध्ये या ट्रस्टची ६६ टक्के भागीदारी आहे. देशातील सर्वात मोठी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएस, टाटा मोटर्स व टाटा स्टीलसारख्या कंपन्या टाटा सन्स चालवते. हा समूह मिठापासून सॉफ्टवेअरपर्यंत विविध व्यवसायांत आहे.  

टाटा आणि शहरास नव्या उंचीवर नेऊ : चंद्रशेखरन  
समूहाचे संस्थापक जे. एन. टाटा यांचे स्मरण करताना नवनियुक्त चेअरमन एन. चंद्रशेखरन म्हणाले : चेअरमनपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर माझी जबाबदारी वाढली आहे. टाटा समूह आणि या शहराचे नाव आणखी उच्च पातळीवर नेण्यासाठी मी प्रयत्न करीन. कंपनीची प्रगती आणि जमशेदपूर हे अविभाज्य घटक आहेत. संस्थापकांच्या प्रेरणेबरोबरच, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि जमशेदपूरवासीयांचे प्रेम मिळावे, हीच एकमेव अपेक्षा आहे. मी माझी जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडेन, असे चंद्रशेखरन म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...