आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RBI Summoned Gold Storage Details From The Banks

प्रमुख मंदिर संस्थानांकडे असलेल्या सोन्याच्या साठ्याचा तपशील रिझर्व्ह बँकेने मागवला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थिरूवनंतपुरम - भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) प्रमुख मंदिर संस्थानकडे असलेल्या सोन्याच्या साठ्याचा तपशील मागवल्याने हिंदू संघटना संतप्त झाल्या आहेत. चालू खात्यातील तूट भरून काढून घसरणीला लागलेला रुपया सावरण्यासाठी मंदिरांकडून सोने आणि सोन्याच्या विटा विकत घेण्याचा आरबीआयचा प्रयत्न असल्याचे वृत्त आहे, मात्र, आरबीआयने ते फेटाळून लावले आहे. केरळमधील काही प्रमुख मंदिर संस्थानच्या पदाधिका-यांनी आरबीआयकडून अशा प्रकारची विचारणा करणारे पत्र मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून सरकार आणि संबंधित अधिका-यांशी सल्लामसलत केल्याशिवाय घाईघाईने कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचे या पदाधिका-यांनी म्हटले आहे.


आरबीआयचे पत्र मिळताच मंदिर व्यवस्थापन समित्यांनी कान टवकारले आहेत. गुरुवायूर येथील प्रसिद्ध श्रीकृष्ण देवस्थानमच्या अजीव सदस्यांची या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक होणार आहे. मध्य केरळमधील थ्रिसूर जिल्ह्यातील गुरुवायूर मंदिराला भाविक मोठ्या प्रमाणावर सोने-चांदी दान करतात. आरबीआयच्या या निर्णयाला काही हिंदू संघटनांनी कडाडून विरोध केला असून यामागे आरबीआयचे षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे. कोणत्याही मंदिर व्यवस्थापनाने आरबीआयच्या या पत्राला दाद देऊ नये, असा हिंदू संघटनांचा आग्रह आहे.


मंदिर व्यवस्थापन समित्या गोंधळल्या
आरबीआयकडून देशातील एखाद्या मंदिराकडील सोने किंवा सोन्याच्या विटांचा तपशील मागवण्याची ही पहिलीच वेळ असल्याने मंदिर व्यवस्थापन समित्या गोंधळून गेल्या आहेत. बहुतांश मंदिर व्यवस्थापन समित्यांची सरकारकडून पुनर्रचना होणेच बाकी असल्याने आरबीआयला काय उत्तर द्यायचे याबाबत त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे गुरुवायूर देवस्वमच्या एका पदाधिका-याने सांगितले.


देशात 30,000 टन सोने
भारतात सोन्याला मोठी मागणी असून गेल्या वर्षी 860 टन सोने आयात करण्यात आले होते. देशात 30,000 टन सोने असावे, असा एक अंदाज आहे. सोन्याला मोठी मागणी असल्यामुळे आयात वाढल्याने सरकारच्या चालू खात्यात 4.8 टक्के तूट नोंदवण्यात आली होती. ही तूट रोखण्यासाठी सरकारने सोन्याच्या आयात शुल्कात नुकतीच 10 टक्के वाढ केली आहे.


पद्मनाभस्वामी मंदिराने वेधले लक्ष
गेल्या वर्षी श्री पद्मनाभस्वामी मंदिराकडे अब्जावधी रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा प्रचंड साठा आढळून आल्यानंतर हे मंदिर प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्याची किंमत 1.3 खर्व रुपये असल्याचा अंदाज त्या वेळी बांधण्यात आला होता.


या मंदिरांना पत्रे
दक्षिण केरळमधील सबरीमाला अयप्पा मंदिरासह बहुतांश मंदिराचे व्यवस्थापन पाहणा-या त्रावणकोर देवस्थानम बोर्ड आणि गुरुवायूरच्या श्रीकृष्ण मंदिर व्यवस्थापनाला आरबीआयचे हे पत्र मिळाले आहे. प्रसिद्ध अय्यप्पा मंदिराच्या दर्शनासाठी दरवर्षी नोव्हेंबर ते जानेवारी या काळात देश-विदेशातून लाखो भाविक येतात.


तपशील गोळा करण्याचा हेतू
मंदिर संस्थानांना आरबीआयने पत्रे पाठवली आहेत. तपशील गोळा करणे हाच त्यामागचा उद्देश आहे. मंदिरांकडून सोने किंवा चांदीच्या विटा विकत घेण्याचा रिझर्व्ह बँकेचा कोणताही प्रस्ताव नाही. -अल्पना किल्लावाला, आरबीआयच्या प्रवक्त्या