आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Real Facts Of Uttarakhand: Water In Eyes, Panic Floods

उत्तराखंड:अडकलेल्या यात्रेकरूंना मोफत तिकिट;महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येकी दोन हजार रुपये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून/ नवी दिल्ली/ मुंबई- उत्तराखंडमधील महाप्रलयात अडकलेल्या यात्रेकरूंच्या मदतीला महाराष्‍ट्र सरकार सरसावले आहे. प्रत्येक यात्रेकरुसाठी दोन हजार रुपयांची मदत जाहीर करण्‍यात आली आहे. तसेच यात्रेकरुंना घरी परतण्यासाठी मोफत तिक‍िट दिले जाणार आहे. तसेच बॉलिवूड अभिनेता अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनीही उत्तरखंडमधील पुरग्रस्तांसाठी 50 लाखांची मदत जाहीर केली आहे.

देवभूमी असलेल्या रुद्रप्रयाग ते केदारनाथपर्यंत सर्व ठिकाणी महाप्रलयाने हाहाकार माजला आहे. उत्तराखंडमधील 60 गावे भूसपाट झाले असून हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आपत्ती निवारण केंद्राने गृहमंत्रालयात सादर केलेल्या अहवालात व्यक्त केली आहे.

काली कमली धर्मशाळा, भारत सेवा आश्रम आणि गढवाल विकास मंडळचे एक हॉटेल उध्वस्त झाले आहे. या तिन्ही धर्मशाळांमध्ये हजारो नागरिक होते. तसेच परिसरातील रामबाडा बाजारही पुरात वाहून गेला आहे. तसेच आजूबाजूच्या छोट्या गावांमध्ये अद्यापही मदत पोहोचू शकलेली नाही. त्यामुळे मृतांचा आकडा काही हजारांमध्ये जाण्याची शक्यता आहे.

उत्तराखंडच्या प्रकोपातील हजारो बेपत्ता लोकांचा शोध घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पण सततचा पाऊस आणि दरडी कोसळणे सुरु असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कैलास मानसरोवर यात्राही वर्षभरासाठी रद्द करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान उत्तराखंडमध्ये सरासरीपेक्षा 450 टक्के अधिक पाऊस झाला आहे. पावसानंतर सगळीकडे गाळाचे साम्राज्य पसरले असून या महाप्रलयात सुमारे 200 कार, दोन जेसीबीही वाहून गेल्याचे समजते. तसेच परिसरातील रस्त्यांवरील पूलही वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

केदारनाथमध्ये सर्वाधिक फटका बसला आहे. तेथे बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. परंतु परिसरातील रस्ते खचल्यामुळे अनेक गावांपर्यत मदत पोहचलेली नाही. स्थानिक प्रशासनाच्या सूत्रांनुसार आतापर्यंत 19 हजारांहून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. परंतु अजून सुमारे 62 हजार नागरिक उत्तराखंडमधील विविध जिल्ह्यात अडकले आहेत.

उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयाचा सर्वाधिक फटका केदारनाथ खोर्‍यातील गावांना बसला आहे. तब्बल 60 गावे भूसपाट झाली असून अनेक गावांचा गेल्या तीन दिवसांपासून संपर्क तुटला आहे. मृतांचा आकड्याने हजारी ओलांडल्याचीही भीती आपत्ती निवारण केंद्राने गृहमंत्रालयाला दिलेल्या माहितीत व्यक्त केली आहे.

केदारनाथमध्ये 90 धर्मशाळा होत्या. तसेच काही खासगी लॉजही होत्या. त्यातील यात्रेकरू अद्याप बेपत्ता आहे. तसेच स्थानिक रहिवाशांबाबतही काही पत्ता नाही. बचाव पथक अद्याप अनेक गावांपर्यत पोहचलेले नसल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

महाराष्ट्रातील 1638 यात्रेकरू सुखरुप असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी संध्याकाळी सांगितले. परंतु अद्याप 334 महाराष्ट्रीयन नागरिक बेपत्ता आहे. त्यांचा शोध सुरु असल्याचेही चव्हाण म्हणाले.

गौरीकुंडात सुमारे पाच हजार यात्रेकरू चारदिवसांपासून अडकले आहे. त्यात बहुतेक महाराष्‍ट्रातील नागरीक आहेत.

पुढील स्लाइडवर ‍क्लिक करून पाहा...महाप्रलयाची बोलकी छायाचित्रे...


मोठ्या युद्धासाठी शेकडो हेलिकॉप्टर आहेत; परंतु मृत्यूशी लढणा-या या जीवांना वाचवण्यासाठी कुणीही नाही. विविध मार्गांवर अडकलेल्या लोकांचे दु:ख,वेदना ‘भास्कर’ने जाणून घेतल्या. त्याचा हा विदारक वृत्तांत...

चहुबाजूंना मृतदेह आहेत, त्यामध्ये पाला वेचून खातो आहे
मी गौरीकुंडमध्ये फसलो आहे. मला वाचवा.इथे चहूबाजूला मृतदेहाचा खच पडला आहे आणि त्याठिकाणी पडलेला पालापाचोळा खाऊन गुजराण करतो आहे.परवा हेलिकॉप्टर आले होते.अन्नाची काही पाकिटे टाकली.पण ती थोड्याच लोकांच्या हाती लागली.पावसानंतर उपासमार सुरु झाली आहे .प्रथम लोक,गाड्यांना पालापाचोळ्यासारखे उडून जाताना पाहिले.आता अन्नान दशा होऊन लोकांचा मृत्यू पाहण्याची वेळ येईल.आता गौरी कुंडच्याजवळ गौरी गावात आहे.गावातील एका कुटूंबाने आम्हा 500 लोकांना आश्रय दिला आहे.अन्य घरांमध्येच आहेत.कु णी मदतीसाठी आलेले नाही. एखादे हेलिकॉप्टर येईल व आम्हाला घेऊन जाईल या आशेवर आम्ही सर्वजण हेलिपॅड बनवत आहोत.
या मोबाईलचाही भरवसा नाही. कधीही बंद होईल. आता फोन ठेवतो.
(केदारनाथ यात्रेवर असलेले जालंधरचे रोहित जामवाल यांनी फोनवर कथन केलेली हकिगत.)

घरच्यांना भेटले, अश्रुंचा बांध फुटला
कुटूंबियांना केवळ एकदा अखेरचे पाहण्याची तीव्र इच्छा होती.पावसाच्या एका थेंबाएवढीच आशा उरली होती.आशेचा तोच एक थेंब बनून लष्कराने मदतीचा हात दिला.कुटूंबियांची भेट झाली आणि आनंदाला पारावर राहिला नाही.

गौरीकुंडमधून 5 हजार लोक बेपत्ता
केदारनाथनंतर आता गौरीकुंडमध्ये प्रचंड हानी झाल्याचे वृत्त आहे. सुमारे पाच हजार लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. यात बहुतांशी यात्रेकरूंना नेण्याचे काम करणा-या हमालांचा समावेश आहे. दुसरीकडे, उत्तराखंडमधील विविध जिल्ह्यांत 62 हजार लोक अडकलेले असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.

हवाईदलावर जबाबदारी
उत्तराखंडमधील विनाशाची अचूक कारणे शोधून काढण्याची जबाबदारी सरकारने हवाईदलावर सोपवली आहे. हवाईदलाच्या सी-130 जे सुपर हर्क्यूलिस विमानाने हवाई सर्वेक्षणास प्रारंभ केला आहे. हे विमान शेकडो किलोमिटरच्या परिघाचे अचूक चित्र टिपण्यात सक्षम आहे.

दहा हजार जवान बचावकार्यात
उत्तराखंडमधील बहुतांश भागांत अशीच परिस्थिती आहे. सरकार मात्र म्हणते की, शक्य तितके प्रयत्न केले जात आहेत. लष्कर, हवाईदल, आयटीबीपी आणि एनडीआरएफचे सुमारे 10 हजार जवान बचावकार्यात जुंपलेले आहेत. हवाईदलाची 24 पेक्षा अधिक हेलिकॉप्टर्स लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवत आहेत.


ज्या हॉटेलमध्ये झोपलो तेच महापुरात वाहून गेले
पांडुकेश्वरमधील ज्या हॉटेलमध्ये आम्ही उतरलो होतो, तेथून 200 मीटर दूर वाहणा-या नदीचे पाणी हॉटेलपर्यंत पोहोचले. रात्री दोन वाजता गोंधळ उडाला. आम्ही बाहेर पडलो तेवढ्यात हॉटेलची भिंत हलू लागली. सुरुवातीस भिंत काहीशी कलली व नंतर संपूर्ण हॉटेल वाहून गेले. काहीच शिल्लक राहिले नाही. तहानभूक विसरून गाडीत बसलो. उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेश सरकारकडून त्यांच्या लोकांना मदत पुरवली जात आहे. कोणी रस्त्यालगत डोंगराच्या खडकाला धरून उभा आहे. कोणी डोंगरावर चढत आहे. जवळपास सर्वच भाविक गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथमध्ये अडकले आहेत.
- बद्रीनाथ यात्रेला गेलेले दांताचे सरपंच बसंत कुमावत, ताराचंद धायल (जिल्हा परिषद सदस्य)


शिट्टीचा इशारा मिळाल्यावर आम्ही डोंगरावर चढत होतो
आम्ही पाच वाहनांतून केदारनाथला जात होतो. हॉटेलमध्ये जागा नसल्यामुळे आम्ही जामोली गावात थांबलो. रात्री हवामान बदलू लागले. धोक्याचा इशारा म्हणून आम्ही शिट्टी वाजवू, त्यानंतर तुम्ही डोंगरावर चढा, असा सल्ला गावक-यांनी आम्हाला दिला होता. एका रात्रीत पाच ते सहा वेळेस शिट्टी वाजवण्यात आली. पाणीपातळी वाढताच लोक शिट्टी वाजवत, त्यानंतर आम्ही मुले, महिला आणि ज्येष्ठांना घेऊन डोंगरावर जात होतो.
-राजेश अग्रवाल, अहमदाबाद

दरड कोसळताना डोंगराचा आधार घेत रस्ता पार केलाव
केदारनाथ व रुद्रप्रयाग येथे गेलेले रायपूरची चार कुटुंबे सुखरूप परतली आहेत. ब्रह्मपुरी येथील नरोत्तम माहेश्वरी यांनी सांगितले, नदीला आलेला महापूर दिसताच आम्ही बसमधून डोंगराच्या रस्त्याने प्रवास सुरू केला. डोंगराच्या कडेला मी नदीचे रौद्ररूप पाहिले. रस्त्यात अनेक दरडी कोसळल्या, अनेक गाड्या नदीत वाहताना पाहिल्या. हॉटेल, घरे पाण्यात बुडाली होती. नदी अक्षरश: टेकड्यांना वाहून नेत होती, डोंगरांनी तर नदीसमोर गुडघे टेकले होते. बूढापारा येथील अतुल चव्हाण यांनी सांगितले की, आमची बस श्रीनगरहून हृषीकेशकडे जात असताना रस्त्याचा सहा फूट भाग पुरात वाहून गेला. त्यामुळे बस थांबवली. बसमधून उतरून डोंगरांचा आधार घेता रस्ता ओलांडला. मग चालकानेही तशाच पद्धतीने गाडी पुढे आणली. त्यापाठोपाठ आणखी काही वाहने तिथून पुढे आली. त्यानंतर काही वेळातच संपूर्ण रस्ता वाहून गेला.