आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रेट फॉल: रेड्डी बंधूंचा बुरूज ढासळला, 'किंग मेकर्सना' आज कोणी विचारत नाही!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासगी हेलिपॅडला कोणी वाली नाही. हेलिकॉप्टर आणि दोन डझन देशी-परदेशी कारच्या ताफ्यासह पाच कोटींची लक्झरी बस पाहून कित्येक दिवस झाले. खाण कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकले आहे. उच्चभ्रू वस्तीत दोन वर्षांपूर्वी तयार झालेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये कोणी व्यवसायासाठी फिरकले नाही. राजवाड्यासारख्या घराची भिंत प्रशासनाने उद्ध्वस्त केली आहे. संकेत स्पष्ट आहेत, रेड्डी बंधूंचा बुरूज आपल्याच सत्ताकेंद्रात ढासळला आहे.

शहरात श्रीमंती थाट मिळवणारा परिसर झाकोळला आहे. तत्कालीन येदियुरप्पा सरकारचे तीन शक्तिमान मंत्री जी. जनार्दन रेड्डी, त्यांचे मोठे बंधू करुणाकर रेड्डी आणि बी. रामुलू यांच्या 15 फूट उंच भिंती आडच्या घराची हीच स्थिती आहे. दोन वर्षांपूर्वी सामान्य लोकांना येथून जाणेही गुन्हा होता. त्या वेळी तीन पाळ्यांमध्ये तैनात शंभरहून अधिक पोलिस होते, आता येथे एकही नाही. रेड्डी कुटुंबाचा बहुचर्चित वरलक्ष्मी पूजा वार्षिक उत्सव आता केवळ औपचारिक कार्यक्रम ठरला आहे. भाजप नेत्या सुषमा स्वराज 1999 नंतर अनेक वर्षे बिलागानामध्ये येत होत्या. रेड्डी यांच्या अटकेनंतर त्या पुन्हा दिसल्या नाहीत. रेड्डी बंधू सोमशेखर व करुणाकर दोघे बेल्लारीमध्ये कमीच दिसतात. रेड्डींच्या गाडीच्या मागेपुढे आठ काळ्या स्कॉर्पिओत काळी पॅँट-टी शर्टच्या पोशाखातील पन्नासहून जास्त खासगी सुरक्षा कर्मचार्‍यांची फौजही गायब आहे. अमूल्य लोहखनिजाच्या खाणीही ओस पडल्या आहेत. 2008-2010 दरम्यान येथे जवळपास सात हजार ट्रक्सची ये-जा होती. एका खाण तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार, या दरम्यान रेड्डी बंधूंची एका दिवसाची कमाई सुमारे 20 कोटी रुपये होती. अखेर सप्टेंबर 2011 मध्ये र्जनादन रेड्डींची अटक या कथेला शेवटाकडे घेऊन गेली.
भाजपशी संबंधित लोकांच्या म्हणण्यानुसार, तुरुंगातून आपली ताकद दाखवण्यासाठी जनार्दन रेड्डींनी निवडणुकीआधी रामुलूला बीएसआर हा वेगळा पक्ष स्थापन करून मैदानात उतरवले. केवळ चार जागा मिळाल्या. करुणाकर रेड्डी भाजपसोबत राहिले. मात्र, तरीही पराभूत झाले. निवडणुकीआधी रेड्डी बंधूंवरील कलंक पुसण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी रेड्डींचे कट्टर विरोधक टपाल गणेश यांना पक्षात प्रवेश देण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, या प्रयत्नाला यश आले नाही. टपाल अवैध खाणकामाविरुद्ध बोलणारे एकमेव व्यक्ती आहेत. त्यांनी 2006 मध्येच रेड्डी बंधूंविरुद्ध तक्रार दिली होती.

वेसण आवळली, मात्र उशिराने : रेड्डींच्या अटकेआधी चार महिने मे 2011 मध्ये येदियुरप्पा यांनी तरुण आयएएस अधिकारी अमलान आदित्य विश्वास यांना बेल्लारीचे जिल्हाधिकारी म्हणून पाठवले. विश्वास यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेच 17 खाणपट्टे रद्द केले. यावर चिडलेल्या जनार्दन रेड्डींनी विश्वास यांना बोलावून आदेश मागे घेण्यास सांगितले. विश्वास म्हणाले, मी पहिल्यांदा त्यांच्या घरी गेलो होतो. आपल्या जवळच्या नेत्यासह ते रागात बसलेले होते. मी त्यांना न्यायालयात जाण्यास सांगितले तेव्हा एक नेता म्हणाला, निर्णय बदलला नाही तर अडचणीत याल. मात्र, मी झुकलो नाही. अन्य एका प्रकरणात विश्वास यांनी रामुलूचा रायचूर येथील नातेवाईक भाजप खासदार सन फकिरप्पाच्या बेकायदा ट्रक वाहतुकीवर अंकुश लावला. फकिरप्पा यांनी याबाबत येदियुरप्पांकडे तक्रार केली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांची बाजू घेतली.

रेड्डी आणि येदियुरप्पातील मतभेद एवढय़ा टोकापर्यंत गेले की एकवेळेस येदियुरप्पा बेल्लारीला आले तेव्हा भाजपचा एकही नेता मुख्यमंत्र्यांजवळ फिरकला नव्हता. बेल्लारीत रेड्डींच्या इशार्‍याशिवाय पानही हलू शकत नव्हते. आता येथे पक्षाचाच सफाया झाला आहे.

रेड्डींच्या जागी आता लाड कुटुंब : बेल्लारीचे राजकारण आता लाड कुटुंबाच्या हातात आहे. हे येथील जुने खाण व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडेही खासगी हेलिकॉप्टर आहे. माजी राज्यसभा खासदार अनिल लाड आणि त्यांचे भाऊ संतोष लाड यांना मंत्री केले आहे. त्यांच्याविरुद्ध एका स्वातंत्र्यसैनिकाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केलेल्या तक्रारीत लाड अवैध खाणकामाला मदत करत असल्यामुळे त्यांना मंत्रिपद देऊ नये असे म्हटले आहे. टपाल गणेश म्हणाले, अनिल लाड यांचे जनार्दन रेड्डींसोबत निकटचे संबंध राहिले आहेत. लोकायुक्त अहवालात दोन्ही कुटुंबांतील संबंधांचा उल्लेख आहे. त्यामुळे राज्यसभा खासदार असताना त्यांनी कधी रेड्डी बंधूंविरुद्ध एक प्रश्नही विचारला नाही.

जी. जनार्दन रेड्डी : धूमकेतूसारखे येणे व जाणे
50 लाख टन अवैध खनिज निर्यातीची चौकशी सुरू
20 महिन्यांपासून हैदराबादच्या चंचलगुडा तुरुंगात
07 वेळा जामीन अर्ज सीबीआय न्यायालयाने फेटाळला

बेल्लारीत भाजपचा सफाया
2008 : 9 विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपच्या 8 तर कॉँग्रेसकडे एक जागा
2013 : भाजपकडे फक्त 1, कॉँग्रेस 6, जनता दल व बीएसआरला प्रत्येकी 1 - 1 जागा

दक्षिणेतील पहिला किल्ला पडला
दक्षिण भारतात भाजपची पहिल्यांदा सत्ता आली तेव्हा बेल्लारीची प्रतिष्ठा सरकारमध्ये शक्तिपीठाच्या रूपात होती. सहा आमदारांचा पाठिंबा मिळणारे रेड्डी बंधू किंग मेकर होते. पाच वर्षांत तीन मुख्यमंत्री झाले. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सत्ताच्युत झालेले येदियुरप्पा आणि रेड्डींचे निकटवर्तीय बी. रामुलू यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. अखेर पक्ष विस्कटला, भाजपची वाताहत झाली.