छायाचित्र : अलाहाबाद येथे सोमवारी झालेल्या धर्मसंसदेत सहभागी साधू, संत.
अलाहाबाद - 'शिर्डीचे साईबाबा हे गुरू आणि देवही नाहीत.’ यामुळे दुष्प्रभावित करणा-या गोष्टींपासून धार्मिक स्थळांना वाचवण्यासाठी हिंदू मंदिरांतून साईंच्या मूर्ती हटवाव्यात, असा ठराव अलाहाबादेतील धर्मसंसदेने मंजूर केला आहे. यासोबतच
आमिर खानच्या वादग्रस्त
पीके चित्रपटावर बंदी आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
धार्मिक भावनांना ठेच पोहोचवणा-या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मंजुरी दिल्याबद्दल सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती, पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत रविवारी धर्मसंसदेचा समारोप झाला. या वेळी धर्मगुरूंनी अनेक ठराव पारित केले.
माघ मेळ्यात शेकडो धर्मगुरू, मार्तंड व धार्मिक नेत्यांनी धर्मसंसदेत इतरही ठराव पारित केले. त्यात प्रामुख्याने गोहत्या बंदी, संस्कृत भाषेचा प्रसार, हिंदूंचे धर्मांतर रोखणे, अयोध्येत राममंदिर, सनातन परंपरांचे पालन व सरकारी योजनांना हिंदी नावे देणे आदींचा समावेश आहे.