आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशिकला प्रकरणात वरिष्ठांवर आरोप करणाऱ्या डीजीपींची बदली; कर्नाटक सरकारची कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- अखिल भारतीय अण्णा द्रमुकच्या (अम्मा गट) नेत्या व्ही. शशिकला यांना लाच घेऊन तुरुंगात ‘विशेष’ सुविधा दिल्याच्या आणि केंद्रीय कारागृहात गैरप्रकार सुरू असल्याच्या मुद्द्यांवरून परस्परांवर जाहीर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या दोन वरिष्ठ कारागृह अधिकाऱ्यांची कर्नाटक सरकारने सोमवारी तातडीने बदली केली. पोलिस महासंचालक (कारागृह) एच. एन. सत्यनारायण राव आणि पोलिस उपमहानिरीक्षक डी. रूपा यांना तत्काळ पदावरून हटवण्यात आले. राव यांनी लाच घेतल्याचा आरोप रूपा यांनी केला होता. बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा प्रकरणात शिक्षा झालेल्या अब्दुल करीम तेलगी यालाही तुरुंगात विशेष सुविधा मिळत असल्याचे रूपा यांनी अहवालात नमूद केले होते.  

राज्य सरकारने सोमवारी एक अधिसूचना जारी केली होती. तीत म्हटले आहे की, भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक एन. एस. मेघारिक यांची तत्काळ प्रभावाने अतिरिक्त महासंचालक (कारागृह) या पदावर बदली करण्यात आली आहे. ते सत्यनारायण राव यांची जागा घेतील. रूपा यांची बदली वाहतूक आणि रस्ते सुरक्षा विभागाच्या उपमहानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. राव यांची कोणत्या पदावर बदली करण्यात आली आणि रूपा यांच्या जागी कोणाची नियुक्ती करण्यात आली, हे मात्र अधिसूचनेत नमूद करण्यात आलेले नाही.  

दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांत जाहीर आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रीय कारागृहातील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त आयएएस अधिकाऱ्यामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच कोणीही गैरप्रकारात सहभागी असल्याचे आढळले तर त्याच्याविरुद्ध ‘कठोर कारवाई’ करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. रूपा यांच्या अहवालामुळे मोठा वाद उद््भवल्यानंतर कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने रूपा यांना वर्तणुकीबाबत स्पष्टीकरण द्या, अशी नोटीस जारी केली होती. तुमची वर्तणूक नियमांच्या पूर्णपणे विरोधात आहे, असे रूपा यांना दिलेल्या नोटीसमध्ये  म्हटले होते.  

रूपा यांनी केलेले आरोप...
कारागृह उपमहानिरीक्षकपदी असलेल्या डी. रूपा यांनी १२ जुलैला तत्कालीन पोलिस उपमहासंचालक (कारागृह) असलेले एच. एन. सत्यनारायण राव यांना एक अहवाल सादर केला होता. शशिकला यांना तुरुंगात विशेष सुविधा पुरवण्यासाठी दोन कोटी रुपये दिल्याची ‘चर्चा’ आहे, या प्रकरणात तुमच्यावरही आरोप आहेत, असे रूपा यांनी राव यांना उद्देशून अहवालात नमूद केले होते. तुरुंगाचे नियम धाब्यावर बसवून शशिकला यांच्यासाठी तुरुंगात विशेष स्वयंपाकघर तयार करण्यात आले आहे, असा आरोपही अहवालात करण्यात आला होता.  

राव यांचे उत्तर...
राव यांनी मात्र आपल्याविरोधातील आरोप फेटाळून लावले होते. रूपा यांनी केलेले आरोप ‘पूर्णपणे चुकीचे, निराधार आणि स्वैर’ आहेत. रूपा यांच्याविरोधात आपण कायदेशीर कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला होता.  

रूपा यांचे प्रत्युत्तर...
रूपा यांनी या इशाऱ्यावर प्रतिक्रिया दिली होती. ‘सत्य शोधण्यासाठी एक सत्यशोधन समिती स्थापन करावी,’ अशी मागणी त्यांनी केली होती.
बातम्या आणखी आहेत...