बिलासपूर - बिंदी, बाळी, हार, कर्णफुले, पैंजण, बांगड्या.. आदी सर्व प्रकारची आकर्षक आभूषणे.. सोन्या-चांदीपासून नव्हे तर ती तांदळापासून बनविली आहेत. आपणास याचे आश्चर्य वाटत असेल मात्र हे वास्तव आहे.
येथील हौशी कलाकार नीरजा हलदार यांनी केवळ तांदळाच्या साहाय्याने स्त्रियांच्या आभूषणांची घडणावळ केली आहे. तांदळाबरोबरच गहू, मूग, उडीद आदी धान्याचा चपखल वापर आभूषणांच्या कलाकुसरीमध्ये करण्यात आला आहे. अवघ्या काही मिनिटांत बनविलेली दागिने खुलून दिसतात. देवरी खुर्द गावच्या रहिवासी नीरजा हलदार पारंपरिक शिल्प व कला प्रशिक्षण शिबिर ‘आकार 2014’ मध्ये दागिने घडविण्याची कला शिकवित आहेत. त्या यासाठी तांदूळ, गहू, मूग, उडदामध्ये मोत्याच्या रूपात चंदन आणि तुळसीच्या बिया गुंफतात. आपल्या कलाकुसरीबाबत नीरजा म्हणाल्या, हिमाचल प्रदेशातील कलाकारांनी सफरचंदाच्या बियांचा उपयोग पारंपरिक दागिन्यांच्या बनावटीमध्ये केल्याचे पाहिले. या आभूषणातून छत्तीसगडला ओळख मिळवून देता येईल, असे वाटले. आता या आभूषणांना संपूर्ण देशभरातून मागणी वाढत आहे.
कोणत्याही प्रकारचा संसर्ग नाही
तांदळापासून आभूषणे बनवण्यासाठी बर्यापैकी खर्च येतो. एक हार तयार करण्यासाठी दोन तास वेळ लागतो. ही आभूषणे सुंदर, हलके आणि टिकाऊ आहेत. या दागिन्यांपासून कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नसल्याचे नीरजा यांनी सांगितले.
महिलांना रोजगार, ऑर्डरही देतात
सामान्य कुटुंबातील गृहिणी असलेल्या नीरजा यांना कलेने मान-सन्मान आणि गुरूचा दर्जा दिला आहे. अनेक गरजू महिलांना त्यांनी या माध्यमातून स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले आहे. नीरजा प्रशिक्षित महिलांना दागिन्यांची ऑर्डर देतात आणि त्या विविध राज्यांत पोहोचवतात.
तरुणींना प्रशिक्षण
नीरजा म्हणाल्या, ही कला छत्तीसगडच्या नावाने ओळखली जावी यासाठी आपल्या नावावर पेटंट मिळवण्यात आले आहे. प्रशिक्षण शिबिरांमध्ये त्यांनी आतापर्यंत अनेक महिला-तरुणींना प्रशिक्षण दिले आहे.
हिमाचलमध्ये सफरचंदाच्या बियांपासून बनवलेल्या दागिन्यांच्या धर्तीवर बिलासपूरमध्ये नवा प्रयोग
छायाचित्र : आभूषणे बनवण्याची कलाकुसर शिकवताना नीरजा हिलदार.