आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणाच्या बहुचर्चित सतलोक आश्रमाच्या वादातून दंगल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोहतक (हरियाणा) - हरियाणाच्या बहुचर्चित सतलोक आश्रमात रविवारी हिंसाचार उसळला. पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये उडालेल्या चकमकीत दोन लोकांचा मृत्यू झाला. संतप्त ग्रामस्थांनी नंतर रस्त्यावरील तीन बसना आग लावली. पोलिसांच्या 26 मोटारसायकली व एक रुग्णवाहिका जाळण्यात आली. यादरम्यान 90 नागरिक जखमी झाले. यामध्ये तहसीलदार व पोलिसांचा समावेश आहे.

आश्रम परिसरातील तणावामुळे शनिवारी दीड हजार पोलिस तैनात करण्यात आले होते. रविवारी सकाळी 6.00 वाजता आर्य समाजाचे नागरिक रोहतक जिल्ह्याच्या करौंथा गावात असलेल्या संत रामपाल यांच्या सतलोक आश्रमात पोहोचले. त्यांनी रस्त्यावर होमहवन सुरू केले. प्रशासनाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, त्या वेळी ते संतप्त झाले. ग्रामस्थांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत लाठीमार केला व अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यानंतर हिंसाचार उसळला. जमावाने बस, मोटारसायकल आणि रुग्णवाहिकेला आग लावली. शाळेत ठेवलेले पोलिस दलाचे साहित्यही भस्मसात झाले. या हिंसाचारात शाहपूर(जि.पानिपत) येथील संदीप नावाचा शिक्षक व करौंथा येथील महिला प्रमिलादेवी यांचा मृत्यू झाला.

काय आहे प्रकरण
सात वर्षांपूर्वी संत रामपाल यांनी महर्षी दयानंद यांच्याबद्दल अनुद्गार काढले होते. यानंतर वादाला सुरुवात झाली. जुलै 2006 मध्ये करौंथाच्या सतलोक आश्रमाबाहेर उडालेल्या चकमकीत एका तरुणाचा मृत्यू झाला होता. यानंतर जिल्हा प्रशासनाने 7 एप्रिल 2013 पर्यंत आश्रम आपल्या ताब्यात घेतला. उच्च् न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाने गाजावाजा न करता आश्रमाचा कब्जा संचालकांना दिला होता. यामुळे 9 एप्रिल रोजी ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांच्या विरोधामुळे प्रशासनाने 30 एप्रिल रोजी कब्जा परत घेतला. रास्ता रोको आंदोलन संपवले. आर्य समाजाने कब्जा परत घेण्यासाठी 12 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत दिली होती.

आर्य समाजाचे प्रतिनिधी ताब्यात
हिंसाचारानंतर पोलिसांनी आर्य प्रतिनिधी सभेचे अध्यक्ष आचार्य बलदेव यांच्यासह अनेक समर्थकांना ताब्यात घेतले.