आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडपाठोपाठ यूपीतही नद्या कोपल्या, अलिगडमध्ये पुरामुळे 2 ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तराखंडमधील पावसामुळे हाहाकार उडालेला असतानाच उत्तर प्रदेशातही गंगा, घाघरा या नद्या कोपल्याने किना-यावरील शेकडो गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. गंगा, घाघरासह अनेक नद्यांनी धोक्याची जलपातळी ओलांडली आहे.


गंगा, यमुना, शारदा, घाघरा, रापती, कुआनन नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याचे राज्यातील अनेक भागात दिसून आले आहे. अलिगडमधील दोघांचा पुरात मृत्यू झाला आहे. खैर आणि गांगिरी तालुक्यातील सहा गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. गेल्या 48 तासांपासून पुराने या भागात थैमान घातले आहे. प्रशासनाने पूरग्रस्तांसाठी विशेष मदत कक्ष स्थापन केला आहे. त्याद्वारे अलिगडसह उत्तराखंडमधील पूरग्रस्त नागरिकांना मदत पुरवली जात आहे. बहरैच, फरुखाबाद, बाराबांकी, लखिमपूर जिल्ह्यातही पाणीच पाणी अशी परिस्थिती झाली आहे. पूर्व उत्तर प्रदेशात आगामी काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम भागात देखील सोसाट्याच्या वा-यासह पावसाचे भाकीत करण्यात आले आहे. गंगा नदीने फरुखाबाद भागात धोक्याची पातळी ओलांडली आहे.


50 दरडी कोसळल्या
उत्तराखंडमधील नैसर्गिक संकटाला भीषण बनवण्यात राज्यातील दरड कोसळण्याच्या घटना अधिक कारणीभूत ठरल्या. पुराबरोबर झालेल्या ढगफुटीत 50 दरडी कोसळल्या. त्यात महत्त्वाचे चार मार्ग बंद झाले आणि शेकडो पर्यटक अडकून पडले. 15 ते 17 जून या काळात प्राणहानीबरोबरच मोठ्या प्रमाणात इमारतींचेही नुकसान झाले.


शत्रुघ्न यांचे 50 लाख
उत्तराखंडला नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी बिहार आणि ओडिशाने मदतीचा हात पुढे केला. दोन्ही राज्यांनी प्रत्येकी 5 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. भाजपचे नेते आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी उत्स्फूर्तपणे 50 लाख रुपयांची मदत दिली आहे.


प्राणहानी वाढू शकते

राज्यात नैसर्गिक संकटामुळे अपरिमित हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी दिली आहे. राज्यावरील हे भयंकर संकट आहे. शेकडो ढिगारे झाले असून प्राणहानीचा आकडा वाढू शकतो. केदारनाथ भागाला सर्वाधिक फटका बसला. अनेक इमारती वाहून गेल्या. त्यांची पडझड झाली आहे.