आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रेटर नोएडामध्ये सहा दरोडेखोरांचा 4 महिलांवर बलात्कार, पुरुषांना बेदम मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रेटर नोएडा / बुलंदशहर - उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडानजीक बुधवारी रात्री दरोडेखोरांनी कारमधील एका कुटुंबातील चार महिलांवर सामूहिक बलात्कार केला. दरोडेखोरांनी रात्री १.३० वाजता गोळी झाडून कारचे दोन टायर पंक्चर केले होते.
 
टायर मागवण्यासाठी चालक मालकास फोन करत हेाता त्याचदरम्यान सहा दरोडेखोरांनी त्याला घेरले. संशयावरून कारमालकाने १.४० मिनिटांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळापासून ठाण्याचे अंतर १५ मिनिटांचे आहे. मात्र, पोलिसांनी येण्यासाठी दोन तास उशीर केला. यादरम्यान त्यांनी चार महिलांवर सामूहिक बलात्कार केला आणि पुरुषांना मारहाण केली.  
 
पीडित कुटुंब जेवरचे रहिवासी आहे. एका नातेवाइकाला रुग्णालयात भेटण्यासाठी ते बुधवारी रात्री कारने बुलंदशहरला गेले होते. गाडीत एका मुलगा व चार महिलांसह एकूण नऊ जण होते. रस्त्यात अचानक साबौता गावाजवळ कारवर वस्तू आदळल्याचा मोठा आवाज झाला. काही कळायच्या आत दोन टायर पंक्चर झाले. गाडी थांबल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांना घेरले. दरोडेखोरांनी ४० हजार रुपये रोख, मोबाइल फोन व दागिने लुटले. प्रकरणाची चौकशी यूपी एसटीएफला देण्यात आली आहे. यामध्ये सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. असे असले तरी गुुरुवारी सायंकाळपर्यंत एकाही आरोपीस पकडण्यात आले नव्हते.  
 
गेल्या जुलैमध्ये नोएडाहून शहाजहानपूरला जाणाऱ्या एका कुटुंबातील महिलेवर व तिच्या मुलीवर १२ जणांनी बुलंदशहरजवळ बलात्कार केला होता. हे प्रकरण सर्वाेच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते.  

प्रत्यक्षदर्शीच्या वेदना
आम्हाला महिलांच्या ओढणीने बांधून पालथे झोपवले. डोके वर काढल्यावर त्यांनी रस्त्यापासून लांब अंतरावर शेतात नेले. रस्त्यावरून जाणाऱ्यांचे लक्ष जाऊ नये यासाठी तसे करण्यात आले. महिलांच्या ओढणीने आमचे हातपाय बांधून पालथे झोपवले. कोणी डोके वर काढले तर लाथ मारली जायची. त्यांनी आमचे पैसे, मोबाइल व दागिने चोरले. यानंतर एका-एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. काका शकील यांनी विरोध केल्यावर दरोडेखोरांनी आमच्या मुलांवर रायफल रोखली. मुलांना मारू नये यासाठी काकांनी गयावया केली. यावर दरोडेखोरांनी पहिली गोळी जमिनीवर व दुसरी काकावर झाडली. आमच्या एका सहकाऱ्यालाही  मारहाण केली.

पोलिस पोहोचेपर्यंत अत्याचार सुरू   
पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत नराधमांचा धुडगूस सुरूच होता. दरोडेखोरांवर गोळीबारही केला, मात्र अंधाराचा फायदा घेत ते पळून गेल्याचा दावा पोलिसांनी केला. दोन तास हे थरारक नाट्य सुरू होते. शहरात खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी पीडितांना ठाण्यात आणले. गुरुवारी नोएडातील एका रुग्णालयात महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. चौकशीसाठी काही सँपल लखनऊला पाठवण्यात आले आहेत.   
 
बातम्या आणखी आहेत...