आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राेहितची अाई, भावाने स्वीकारला बाैद्ध धर्म, प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठात आत्महत्या केलेला संशोधक विद्यार्थी राेहित वेमुला याची आई राधिका आणि भाऊ राजा चैतन्यकुमार या दोघांनी बाबासाहेबांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी दादर येथील आंबेडकर भवनात बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीदिनी होत असलेला धम्मदीक्षेचा हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो आंबेडकरी अनुयायांनी गर्दी केली होती. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अायाेजित या कार्यक्रमात भंते धर्मरक्षित यांनी या दोघांना दीक्षा दिली.

राधिका आणि राजा यांनी प्रथम गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली. त्यानंतर त्यांना त्रिशरण पंचशील ग्रहण करण्याचा सोहळा झाला. बाबासाहेबांनी बनवलेल्या २२ धम्मप्रतिज्ञांचे वाचन केल्यानंतर या दोघांनी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धम्माचा स्वीकार केल्याचे जाहीर केले व ‘जय भीम’ असा नारा दिला. त्या वेळी टाळ्यांच्या गजरात या दोघांचे उपस्थितांनी जोरदार स्वागत केले. रोहितची आई राधिका यांनी तेलुगूमधून पत्रकारांशी संवाद साधला. ‘बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीला त्यांच्या नातवाच्या नेतृत्वाखाली आम्ही बौद्ध धर्मात आलो आहोत, आजचा िदवस आमच्यासाठी अतिखास आहे,’ असे त्या म्हणाल्या. प्रकाश आंबेडकरांनी कन्हैयाकुमार याच्या गाडीवर नागपूरमध्ये झालेल्या दगडफेकीचा िनषेध केला. बाबासाहेबांनी ज्या तत्त्वांना हयातभर विरोध केला, तीच संकुचित व्यवस्था देशात संघ आणू पाहत आहे, असा आरोपही केला.

आज मी स्वतंत्र झालो!
हा साेहळा पाहून रोहितला आनंदच झाला असता. पूर्वी आम्ही बौद्ध नव्हतो, तरी बाबासाहेबांनी दाखवलेल्या वाटेने जात होतो. जातीयवादी हिंदू धर्म त्यागल्याने खऱ्या अर्थाने आम्ही स्वतंत्र झालोत. आमचा संघर्ष हिंदू धर्माशी नाही, तर ब्राह्मणी विचारांशी आहे. राेहितच्या आत्महत्येचा तपास योग्य व्हावा इतकीच अपेक्षा आहे. त्यासाठी कायम लढू. आम्हाला माहिती आहे, ही लढाई कठीण आणि दीर्घ आहे. पण गौतम बुद्ध, बाबासाहेब आणि रोहित आमच्याबरोबर अाहेत. त्यामुळे आमचा विजय नक्की आहे..... जय भीम!
- राजा चैतन्यकुमार वेमुला (राेहितचा भाऊ)
छायाचित्र: गाैतम बुद्ध व अांबेडकरांना अभिवादन करताना राेहित वेमुलाची आई राधिका व भाऊ राजा चैतन्यकुमार.