आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rohith Vemula Suicide Issue Rahul Sit On Hunger Strike

#RohithVemula: \'राहुल यांनी विद्यापीठाला राजकारणाचा अड्डा करु नये\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज (शनिवार) दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्या प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी उपोषणाला बसले आहेत. अशावेळी राहुल गांधी यांनी तिथे जाऊन विद्यापीठाला राजकारणाचा अड्डा करु नये असे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटले आहे. तर एचआरडी मंत्री स्मृती इराणी यांनी यावर मौन पाळणे योग्य समजले. दुसरीकडे, राहुल यांनी ट्विट करुन सांगितले, की न्यायाच्या लढाईत मी रोहितच्या कुुटुंबियांसोबत आहे.
शुक्रवारी रात्री विद्यार्थ्यांसोबत थांबल्यानंतर आज सकाळी 9.15 वाजतापासून राहुल गांधी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत रोहितची आई, भाऊ आणि रोहितसोबत निलंबित झालेले दोन विद्यार्थी आहेत. आंदोलनात सहभागी होण्यासाठी राहुल गांधी शुक्रवारी रात्री हैदराबादला पोहोचले. शनिवारी रोहितचा जन्मदिन आहे. दरम्यान, एबीव्हीपीने राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे.
विद्यापीठाला राजकारणाचा अड्डा करु नये - गडकरी
हैदराबादमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या राहुल गांधी यांच्या भूमिकेवर भाजप भडकली आहे. भाजप नेते आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी राहुल यांच्या आंदोलनावर टीका केली. ते म्हणाले, 'राहुल गांधींनी, विद्यार्थी आत्महत्येच्या घटनेनंतर विद्यापीठ परिसरात जाऊन विद्यापीठाला राजकारणाचा अड्डा बनवू नये. संसदेचे अधिवेशन आहे. त्यांनी संसदेला राजकारणाचा अड्डा बनवावे. त्यांचे काय प्रश्न असतील ते संसदेत उपस्थित करावे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करावा.'

मृत्यूचे राजकारण करत आहेत राहुल गांधी - भाजप
माध्यमांमधील वृत्तानुसार भाजपने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर मृत्यूचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, राहुल गांधी स्वतःचे राजकारण चमकवण्यासाठी हैदराबादेतील घटनेचा वापर करत आहेत. बिहारमधील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेबद्दल ते का काही बोलत नाहीत.
राहुल गांधी यांच्यासोबत रोहितची आई देखिल एक दिवसीय उपोषण आंदोलनात सहभागी होत आहे. रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर तिसऱ्याच दिवशी राहुल हैदराबादेत दाखल झाले होते. त्यांनी रोहितच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते, त्यानंतर आंदोलकांशी संवाद साधला होता. याशिवाय इतरही पक्षांचे नेते हैदराबादला पोहोचले होते.

काय म्हणाले दिग्विजयसिंह
- काँग्रेस महासचिव दिग्विजयसिंह यांनी शुक्रवारी सांगितले, की राहुल गांधी कँडल मार्चमध्ये सहभागी होतील आणि विद्यापीठ परिसरात उपोषणाला बसणार आहेत.
- रोहित वेमुला या दलित स्कॉलरच्या आत्महत्ये प्रकरणी काँग्रेसने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय श्रम राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्यासह कुलगुरु अप्पा राव यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

प्रभारी कुलगुरु बदलले
राहुल गांधी हैदराबादला पोहोचण्याआधी विद्यापीठ प्रशासनाने महत्त्वाचे बदल केले. प्रभारी कुलगुरु डॉ. विपिन श्रीवास्तव सुट्टीवर गेले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आता त्यांची जबाबदारी रसायनशास्त्राचे प्राध्यापक एम. पेरियास्वामी यांच्याकडे देण्यात आली आहे.
कुलगुरु पी. अप्पाराव यांच्यानंतर वरिष्ठ प्राध्यापक श्रीवास्तव यांना प्रभारी कुलगुरु करण्यात आले होते.

राहुल गांधींच्या आगमनानंतर ABVP आक्रमक
- शुक्रवारी हैदराबाद विद्यापीठात आलेल्या राहुल गांधी यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला.
- राहुल गांधीच्या आगमनाचा विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
- ABVP ने आरोप केला आहे की या प्रकरणाचे राजकारण केले जात आहे.
- याआधी चेन्नईमध्ये एका दलित विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती, तेव्हा का नाही राहुल तिथे गेले, असा सवाल एबीव्हीपीने उपस्थित केला आहे.
- राहुल गांधी यांच्यासोबतच आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, एमआयएम प्रमुख ओवेसी यांनी स्वतंत्रपणे आंदोलकांची भेट घेतली. केंद्र सरकारचेही काही मंत्री येऊन गेले.
काय आहे आत्महत्या प्रकरण
- आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील दलित स्कॉलर्स रोहित वेमुला हैदराबाद विद्यापीठात पीएच.डी करत होता. रोहितसह आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या पाच विद्यार्थ्यांवर भाजप प्रणित विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्याला कथितरित्या ऑगस्टमध्ये मारहाण केल्याचा आरोप होता.
- विद्यापीठाच्या समितीने केलेल्या तपासात पाचही विद्यार्थ्यांना निर्दोष सोडून देण्यात आले होते. सुरुवातीच्या तपासात निर्दोष ठरलेल्या विद्यार्थ्यांवर नंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांना 21 डिसेंबर रोजी हॉस्टेलमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली. विद्यापीठ आवारात त्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली.
- पाच विद्यार्थ्यांवरील कारवाई भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्या आदेशानुसार झाल्याचा विद्यार्थी संघटनांचा आरोप आहे. दत्तात्रेय यांनीच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयावर दबाव आणून विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थ्यांना विद्यापीठाबाहेर काढण्याचा आदेश दिला.
- आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांवरील या अन्याय्य कारवाईविरोधात 10 विद्यार्थी संघटना एकवटल्या होत्या. विद्यार्थ्यांवर घातलेली बंदी उठविण्यासाठी संघटनांनी रविवारी उपोषण केले होते.
- रविवारी रात्रीच रोहितने हॉस्टेलच्या एका रुममध्ये फाशी घेतली. पोलिसांना घटनास्थळी पाच पानी सुसाइड नोट सापडली.
- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सोमवारी एक तपास समिती स्थापन करुन या प्रकरणाचा अहवाल देण्यास सांगितले आहे.
पुढील स्लाइडमध्ये, रात्रभर विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी