चेन्नई - कधी काळी दोन सॉफ्टवेअर कंपन्यांचे मालक राहिलेल्या ६३ वर्षीय के. व्ही. रमणी व्यावसायिक व्यापातून मुक्त झाले आहेत. दहा वर्षांपूर्वी २३५ कोटी रुपयांत
आपल्या दोन सॉफ्टवेअर कंपन्या विकणाऱ्या रमणी यांनी सव्वाशे कोटी रुपयांची गुंतवणूक शिर्डीमध्ये केली आहे. या पैशांतून त्यांनी भाविकांना थांबण्यासाठी १५०० खोल्या बांधल्या आहेत. साधारण नऊ हजार भक्त निवास करू शकतील असा परिसर त्यांनी शिर्डी संस्थानकडे सोपवला आहे. देशभरातून येणाऱ्या भािवकांची आता इथे गर्दी होत आहे.
चेन्नईपासून ४० किमी अंतरावर कृष्णकनाई गावात सागरी किनाऱ्यावरील साई मंदिर ही रमणी यांची कर्मभूमी. दहा वर्षांपासून रोज सायंकाळी रमणी येथे आरतीसाठी येतात. शिल्लक राहिलेल्या पुंजीमधून लोकांची सेवा करण्याचे एकमेव व्रत त्यांनी अंगीकारले. भौतिकशास्त्रात पदवीधर रमणी यांनी १९७९ मध्ये आयबीएमध्ये सिस्टिम अॅनॅलिस्ट प्रोग्रामरची नोकरी सुरू केली होती.
१५ वर्षांपर्यंत त्यांनी अनेक कंपन्यांत काम केले. यानंतर त्यांनी फ्युचर सॉफ्टवेअर नावाची कंपनी स्थापन केली. अमेरिका, इंग्लंड, चीनसह १० देशांमध्ये व्यवसायाचा विस्तार झाला. केवळ पाच वर्षांत ते अमेरिकेची प्रसिद्ध कंपनी हगेज सॉफ्टवेअरचे भागीदार झाले. मात्र, २००४ मध्ये त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यांनी फ्लेक्ट्रॉनिक्स नावाच्या अमेरिकी कंपनीला आपला व्यवसाय विकला.
साईंवर असलेल्या आपल्या अपार श्रद्धेविषयी रमणी म्हणाले, मी खूप वर्षांपासून साईबाबांच्या शिर्डीला जात होतो. जगभरातून शिर्डीला येणाऱ्या भक्तांसाठी काही करण्याची इच्छा होती, त्यामुळे ते कामही आता पूर्ण झाले आहे. दोन ट्रस्टना शिल्लक राहिलेला पैसा दिला आहे. हा पैसा देशातील गरजू व्यक्ती संस्थांवर खर्च केला जाईल. आता हेच माझे आयुष्यभराचे मुख्य कार्य झाले आहे.
त्या क्षणात वाटले स्पर्धेतून मुक्त व्हावे :
पाच बहिणींना मी एकटा भाऊ आहे. वडील नामांकित वकील होते. चेन्नईच्या मायलापूरमध्ये माझे घर होते. तिथे १२००० वर्षांपूर्वीचे एक महादेवाचे मंदिर आहे. तिथेच साईबाबांचे प्रसिद्ध दक्षिण भारतीय भक्त नरसिंहास्वामी यांनी बाबांचे मंदिर स्थापन केले. तेव्हा कधीकधी दर्शनाला जात होतो. यानंतर मला वाटले मला नोकरी व्यवसायामध्ये साईंचे प्रोत्साहन मिळत आहे.
नोकरी सोडून कंपनी स्थापन केली तेव्हा वाटले व्यवसाय हा माझ्या आयुष्यातील एक टप्पा आहे, अंतिम उद्दिष्ट नाही. ११ वर्षांत कधी कल्पनाही केली नव्हती, अशी व्यावसायिक उंची गाठली. व्यावसायिक स्पर्धेतून मुक्ती घ्यावी असे २००४ मध्ये अचानक वाटले. तेव्हा सर्वात पहिल्यांदा शिर्डीची आठवण झाली. गरीब शब्द खूप वाईट आहे, असे मला वाटते. कमी पैसे असणारे ते बुद्धिमान लोक असतात. या लोकांच्या शिक्षण आरोग्यासाठी माझ्या कमाईतील काही वाटा काढून ठेवला. शिर्डीत १५३६ खोल्या बांधल्या. गेल्या उन्हाळ्यात भािवकांनी सर्व खोल्या पहिल्यांदा भरल्या. शिल्लक पैशांतून देशभरातील गरजूंना मदत करण्याचे पूर्णवेळ काम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.