आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२७ विमानांमधून निघाली अडीच हजार साईभक्तांची हरिद्वार हवाई तिर्थयात्रा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरिद्वार - साईचरित्र पारायणार्थींच्या हवाई तीर्थयात्रेप्रसंगी दिल्ली विमानतळ, हरिद्वार, हृषीकेश येथे ‘सबका मलिक एक’ हा संदेश अवघ्या विश्वाला देणाऱ्या साईबाबांच्या पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले.भल्या सकाळीच गुलाबी थंडीत हजारो साईभक्तांनी साईनामाच्या जयघोषात गंगास्नान करून हरिहर की पेडी, गंगा मंदिर, मानसा देवी, ऋषिकेश, रामझुला, लक्ष्मण झुला, गीता मंदिर, स्वर्गाश्रम आदी ठिकाणच्या प्राचीन व पुरातन मंदिरांचे दर्शन घेतले. या ठिकाणी हरिद्वार येथील ग्रामस्थांनी साईभक्तांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
साई निर्माण गृप, साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने सालाबादप्रमाणे साईचरित्र पारायणार्थींना हवाई तीर्थयात्रेचे आयोजन केले आहे. गुरुवारी २७ विमानांमधून सुमारे अडीच हजार साईभक्तांची ही तिर्थयात्रा हरिद्वारला पोहोचली.
साईभक्तांनी भल्या सकाळीच हरिहर की पेडी येथे अलकानंद, मंदाकिनी, यमुनोत्री,गंगोत्री या हिमालयामधून उगम पावलेल्या चार नद्यांचा संगम झालेल्या गंगेचे स्नान केले. या तीर्थक्षेत्री जोशी मठ, ऋद्र प्रयाग, गौरी कुंड याही महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्रांचे भाविकांनी मनोभावे दर्शन केले. जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगा मंदिर मानसादेवी या तीर्थस्थळांनाही भेटी दिल्या. दुपारी हृषीकेश येथे रामझुला, लक्ष्मण झुला, गीता मंदिर आदी वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या धार्मिक पर्यटनस्थळांचेही दर्शन घेतले.

यात्रेचे मुख्य संयोजक विजय कोते व साईसिध्दी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कैलास कोते हे साईभक्तांसाठी आवश्यक त्या सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लक्ष ठेवून अाहेत. साईभक्तांच्या या यात्रेत भाविकांची काहीही गैरसोय होणार नाही, यासाठी धंनजय साळी, सुनिल मंडलीक, गणेश सोमवंशी, भरत चांदोरे, किरण आहेर, भागवत शिंदे परिश्रम घेत आहेत.
साईनामात भाविक चिंब
सर्वच वयोगटातील भाविकांचा यात्रेत समावेश असून निवास, भोजन व पर्यटनाच्या ठिकाणची व्यवस्था सर्वांना आनंद मिळवून देणारी ठरली आहे. टाळ-मृदंगाचा निनाद, पारंपरिक वाद्यांच्या तालावर अवघे साईभक्त नाचत, गात व फुगड्या खेळून साईनामात चिंब झाले. हरिद्वार येथे साईदर्शन यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. हरिद्वार येथील साईभक्तांनी व हरिद्वार ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतषबाजीत या साईभक्तांच्या तीर्थयात्रेचे स्वागत केले.
बातम्या आणखी आहेत...