फाइल फोटो : प्रदर्शनात आपलेच पेंटींग पाहताना ममता बॅनर्जी
नवी दिल्ली - शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 1 कोटी 80 लाख रुपयांत विक्री करण्यात आलेले त्यांचे एक पेंटिंगही या प्रकरणात सीबीआयच्या रडारवर आले आहे. हे पेंटिंग शारदा ग्रुपचे प्रमोटर सुदीप्ता सेन यांनी खरेदी केले होते. सीबीआई आता आयकर विभागाकडून या प्रकरणी माहिती गोळा करत आहे.
तपास संस्थेशी संबंधित सुत्रांच्या मते, या प्रकरणी माहिती मिळवण्यासाठी लवकरच ममता यांचे निकटवर्तीय असलेले माजी केंद्रीय मंत्री मुकूल रॉय यांची चौकशी केली जाणार आहे. दिवाळीनंतर त्यांची चौकशी केली जाऊ शकते. सीबीआईच्या अधिका-यांनीही त्याला दुजोराही दिला आहे. आयकर विभाग यासंबंधी रॉय यांची विचारपूस करू शकते असेही सांगितले जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी अटकेत असलेले शारदा ग्रुपचे चीफ कुनाल घोष यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही चौकशी करण्यात येणार आहे.
मोदींनीही उपस्थित केला होता मुद्दा
लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनीही ममतांची पेंटिंग 1 कोटी 80 लाखात विक्री झाल्याचा मुद्दा उचलला होता. सुदीप्ता सेन यांनी मात्र कोणतीही पेंटिंग खरेदी केली नसल्याचे सांगत या प्रकरणातून अंग काढून घेतले होते. पण आयकर विभागाच्या मते तृणमूलने त्यांच्या रिटर्नमध्ये याचा उल्लेख केला आहे. समुहाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पेंटिंग खरेदी केल्याचा उल्लेख त्यात आहे. तसेच तृणमूलच्या आयकर रिटर्नमध्ये प्रदर्शनाच्या खर्चाची नोंदही होती.