आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये पुन्हा बहरणार चित्रपट शूटिंग पर्यटन, J&K सरकारचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- काश्मीरमध्ये पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी मुफ्ती सरकारने निर्णायक धोरण आखले आहे. यानुसार राज्यात चित्रपटांचे शूटिंग करायचे असेल तर त्यासाठी सर्व परवानग्या आठ दिवसांत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
याआधी सुरक्षेच्या कारणास्तव ही प्रक्रिया खूपच दीर्घकाळ चालत होती. त्यामुळे काश्मीरमध्ये चित्रीकरण करण्यास अनेक निर्माते, दिग्दर्शक उत्सुक नसत. परंतु मुफ्ती मोहंमद सईद सरकारने एक समिती स्थापन केली असून त्यांच्या माध्यमातून चित्रीकरणासाठी त्वरित परवानग्या दिल्या जाणार आहेत. जर येथे पुन्हा चित्रीकरण सुरू झाले तर त्या माध्यमातून काश्मीरबाबत जगभरात सकारात्मक संदेश जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे.
सलमान खानच्या आगामी चित्रपट "बजरंगी भाईजान'चे चित्रीकरण काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये विविध ठिकाणी पार पडले. चित्रपटाचे युनिट शूटिंग पाहण्यासाठी स्थानिक देशी पर्यटक मोठ्या संख्येने खोऱ्यात आले. त्यामुळे येथील पर्यटन स्थानिक रोजगाराला चालना मिळाली होती. ही बाब लक्षात घेऊन सईद सरकारने काश्मीरमध्ये चित्रीकरणास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी वेलकम टू कराची या चित्रपटाची संपूर्ण टीम निर्माता, दिग्दर्शक वासू भगवानीच्या नेतृत्वाखाली येथे प्रमोशनसाठी दाखल झाली होती. इतकेच नव्हे तर या टीमने काश्मीरमध्ये सिनेमागृह बांधण्याचीही घोषणा केली आहे. पर्यटन विभागाचे सचिव शैलेंद्रकुमार यांनी याला दुजोरा दिला आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री मुफ्ती माेहंमद सईद यांनी मुंबईत एका कार्यक्रमात निर्माता - दिग्दर्शक तज्ज्ञांची भेट घेऊन त्यांना काश्मीरमध्ये येऊन चित्रीकरण करण्याचे निमंत्रण दिले होते. काश्मीरचे सौंदर्य जगाला दिसावे म्हणून येथे चित्रीकरण करा, असे आवाहन त्यांनी केले होते. सईद यांच्या आवाहनानंतर अनेक निर्मात्यांची पावले काश्मीरकडे वळली आहेत.

याआधीही झाले शूटिंग
काश्मीरमध्येदहशतवाद फोफावण्याआधी अनेक चित्रपटांचे शूटिंग होत असे. विविध भाषांमधील चित्रपटांचे चित्रीकरण काश्मीरमध्ये पार पडली आहेत. हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांसाठी तर काश्मीर हे अत्यंत आवडते ठिकाण होते. दहशतवाद फोफावल्यानंतर मात्र ही परंपरा खंडित झाली. दहशतवाद नियंत्रणात आल्यानंतर नंदनवनात चित्रीकरण झालेला पहिला चित्रपट शाहरुख खानचा "जब तक है जान' हा होता. त्यानंतरच्या काळात शाहिद कपूरच्या "हैदर'सह अनेक चित्रपट येथे चित्रित झाले आहेत. सध्या सलमानच्या "बजरंगी भाईजान'चे चित्रीकरण येथे सुरू आहे.
‘बेताब’मुळे पहलगामला मिळाली ओळख
अभिनेतासनी देओलचा पहिला चित्रपट "बेताब'चे संपूर्ण चित्रीकरण पहलगाममध्ये झाले होते. त्यानंतर हे ठिकाण देशविदेशात लोकप्रिय ठरले. काश्मीर सरकारने तर पहलगाम येथे बेताब व्हॅली नावाने एक ठिकाणही विकसित केले होते.