आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Mirza News In Marathi, Brand Ambassador, Telangana

राष्ट्रीयत्वाचा वाद: पाकिस्तानी सून तेलंगणची ब्रॅंड अ‍ॅम्बेसेडर कशी?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद/ नवी दिल्ली- भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मैदाने मारली. देशाला प्रतिष्ठाही मिळवून दिली. मात्र, टेनिसच्या कोर्टात कधीही वाद ओढवून न घेता कारकीर्द गाजवलेल्या या टेनिसपटूला तेलंगणाची ब्रँड अम्बेसेडार म्हणून नियुक्त करताच देशभर राजकीय वादंग माजले आहे. ‘पाकिस्तानची सून तेलंगणची बँ्रड अम्बेसेडर कशी होऊ शकते,’ म्हणत यावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला. तर, शेवटच्या श्वासापर्यंत भारतीयच राहीन,’ असे सानियानेही प्रत्युत्तर दिले. तेलंगणात नुकत्याच सत्तेत आलेल्या तेलंगण राष्ट्रीय समिती सरकारने सानियाला राज्याची ब्रँड अम्बेसेडर म्हणून मंगळवारी घोषित केले होते. मानधनापोटी 1 कोटी रुपयांचा धनादेशही मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी प्रदान केला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपचे आमदार के. लक्ष्मण यांनी तीव्र आक्षेप घेत सानियाला ‘पाकिस्तानची सून’ असे संबोधले होते. हा सन्मान सानियाला दिला जाऊ नये, अशी मागणी त्यांनी केली होती.
लक्ष्मण यांचा आरोप
लक्ष्मण म्हणतात, सानिया पाकिस्तानची सून आहे. आगामी काळात हैदराबाद महापालिका निवडणुकीत अल्पसंख्यांकांच्या मतांवर डोळा ठेवून राव यांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, विधानसभेतही लक्ष्मण यांनी सानियाला ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्ती देण्यासंदर्भात सुरू असलेल्या कामकाजात सहभाग घेतला नाही. तेलंगणा राज्यनिर्मितीच्या लढ्यात सानियाचे कवडीचे योगदान नाही.

अखेरच्या श्वासापर्यंत भारतीयच : सानिया
आपल्या नियुक्तीवरून सुरू झालेल्या वादामुळे सानिया व्यथित झाली आहे. ती म्हणाली, ‘मी भारतीय आणि आणि शेवटच्या श्वासापर्यंत भारतीयच राहीन.’ हैदराबादच्या उभारणीत आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाचा दाखलाही तिने दिला. जवळपास शतकापासून आपले घराणे या शहरात वास्तव्य करून असल्याचे सांगताना सानिया म्हणते, ‘निजाम रेल्वेत 1948 पर्यंत अभियंता म्हणून कार्यरत राहिलेले पणजोबा मोहंमद अहमद मिर्झा यांनी हैदराबादच्या उभारणीसाठी कष्ट घेतले आणि इथेच त्यांनी देह ठेवला.’

जन्मापासून हैदराबादेत राहिलेल्या पणजोबांनी अभियंता म्हणून शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेत दिलेले योगदान तिने सांगितले. उस्मानसागर तळ्यावर बांधण्यात आलेल्या प्रसिद्ध धरणाच्या उभारणीत आपल्याच घराण्याचे योगदान असल्याचे सानिया म्हणाली. 1908 मध्ये ऐतिहासिक मुसी नदीला आलेल्या पुराच्या काळात पणजोबांनी अहोरात्र मदतकार्य करून अनेक जीव वाचवल्याचेही तिने सांगितले.

आक्षेप का?
मूळ हैदराबादची रहिवासी असलेली सानिया पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्याशी 12 एप्रिल 2010 मध्ये विवाहबद्ध झाली. तिचा हा विवाह पण कित्येक दिवस चर्चेत राहिला. मात्र, तिचा तो वैयक्तिक निर्णय असल्याने नंतर विरोधाची धार कमी झाली होती. आता नव्याने तिच्याबद्दल वाद पेटला आहे.

राज्यातील व्यक्तीचीच निवड करा
>सानिया मुंबईत जन्मली. ती हैदराबादेत वाढली असली तरी तिने पाकिस्तानी व्यक्तीशी विवाह केला आहे. ती पाकिस्तानची सून आहे. म्हणून तेलंगणाचा ब्रँड अम्बेसेडर म्हणून तेलंगणासाठी खस्ता खाल्लेल्या व्यक्तीचीच नियुक्ती व्हायला हवी.
- के. लक्ष्मण, भाजप नेते, तेलंगण.