हैदराबाद - कॉर्पोरेट जगताला हादरवून सोडणार्या १४ हजार कोटी रुपयांच्या सत्यम घोटाळ्याचा निकाल अखेर सहा वर्षांनंतर लागला. कंपनीचे तत्कालीन मालक बी. रामलिंगा राजूला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली. सोबतच ५.५ कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
राजूचा भाऊ बी. रामा राजूसह उर्वरित नऊ आरोपींनाही ७-७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. हा देशातील सर्वात मोठा अकाउंटिंग घोटाळा होता. कॉर्पोरेट जगताला हादरा देणारा हा घोटाळा स्वत: राजू यानेच ७ जानेवारी २००९ रोजी उघडकीस आणला. सेबीला पत्र लिहून अकाउंट्समध्ये खाडाखोड करून अव्वाच्या सव्वा नफा वाढवून दाखवल्याचे कबूल केले होते. खात्यामध्ये ७००० कोटींचा घोळ झाला होता. पर्दाफाश झाल्यानंतर दोन दिवसांनी दोन्ही भावांना अटक करण्यात आली होती. निकालाच्या वेळी ते कोर्टात हजर होते. त्यांना अटक करून तुरुंगात टाकले.
स्पिनिंग मिल ते तुरुंगापर्यंतचा प्रवास
- आंध्र प्रदेशच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेले रामलिंगा राजू यांचा स्पिनिंग मिलचा व्यवसाय होता. कंपनीचे नाव होते श्री सत्यम.
- १९८७ मध्ये २० कर्मचार्यांसह सत्यम कंपनी स्थापन केली. १९९२ मध्ये पब्लिक लि. झाली. अमेरिकेतही लिस्टेड झाली.
- कंपनीचा कारभार ६६ देशांमध्ये विस्तारला होता. २००२ मध्ये सत्यमला आशिया बिझनेस लीडर सन्मान मिळाला होता.
- २००१ व २००३ मध्ये फसवणुकीची तक्रार झाली होती. तेव्हा तिची गांभीर्याने दखल घेतली नाही. जागतिक बँकेने कंपनीशी कोणत्याही देवाणघेवाणीवर ८ वर्षांची बंदी लादली होती.
- जुलै २००९ मध्ये सरकारी लिलावात महिंद्राने कंपनी विकत घेतली आणि कंपनीचे नाव महिंद्रा सत्यम झाले. २१ मार्च २०१२ रोजी तिचे टेक महिंद्रामध्ये विलीनीकरण झाले.
कॉर्पोरेट जगतातले बेइमानीचे दुसरे सर्वात मोठे प्रकरण
राजू बंधू कलम ४०९ (विश्वासघात), कलम १२० -ब (गुन्हेगारी कट), ४२० (फसवणूक) व अन्य कलमान्वये दोषी.
23 वर्षांपूर्वी हर्षद मेहता प्रकरण : मेहताने १९९२ मध्ये जानेवारी ते एप्रिलदरम्यान ९० कंपन्यांचे २८ लाख शेअर खरेदी केले, मग विकले. बाजाराचे १ लाख कोटी बुडाले. मेहतावर २७ वर्षे खटला चालला. एकात दोषी. २००१ मध्ये तुरुंगातच मृत्यू झाला.
दोन महिन्यांच्या आत राजू या निकालाला हाय कोर्टात आव्हान देऊ शकतो. तो निकालही विरोधात गेला तर सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो.
लीना मंगतने केली होती प्रथम तक्रार
सत्यमविरुद्ध सिकंदराबादच्या लीना मंगत यांनी पहिली तक्रार केली होती. सीबी- सीआयडीने जानेवारी २००९ मध्ये गुन्हा नोंदवला होता. लीनाने सत्यममध्ये १९ हजार रुपये गुंतवले होते; परंतु कंपनीतील घोटाळ्यामुळे ते बुडाले, असे तक्रारीत म्हटले होते.