नवी दिल्ली- आई-वडिलांच्या इच्छेखातर युवतींनी प्रेमाचा त्याग करणे भारतात अत्यंत सामान्य बाब असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने हा निकाल 1995 च्या एका प्रकरणात सुनावला आहे. या प्रकरणात लपवुन लग्न केल्यानंतर एका जोडप्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नात मुलीचा मृत्यू झाला होता तर मुलाचा जीव वाचला होता. सत्र न्यायालयाने या प्रकरणात मुलाला मुलीच्या खूनप्रकरणी दोषी ठरत जन्मठेपीची शिक्षा सुनावली होती. राजस्थान हायकोर्टाने हा निर्णय कायम ठेवला होता. या निर्णयाविरोधात मुलाने सुप्रीम कोर्टात अपील केले होते. सुप्रीम कोर्टाने हा निर्णय रद्द ठरवला.
काय म्हणाले सुप्रीम कोर्ट
- न्यायाधीश ए. के. सीकरी आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, कदाचित मुलगी अनिच्छेनेच सुरुवातीला आई-वडिलांच्या निर्णयासोबत असेल. त्यानंतर तिने आपला निर्णय बदलला होता. ही गोष्ट घटनास्थळावर मिळालेल्या कुंकु, हार आणि बांगड्यावरुन स्पष्ट होते. या मुलीने कदाचित आपल्या प्रियकराला हे देखील सांगितले असेल की आपल्या कुटुंबियाच्या विरोधामुळे मी तुझ्यासोबत लग्न करु शकत नाही.
- मुलींसाठी अनिच्छेनच का असेना पण पालकांचा निर्णय कबूल करणे आणि आपल्या प्रेमाचा त्याग करणे ही या देशात एक अत्यंत सामान्य बाब आहे.
जात वेगळी असल्यानेच लग्नाला विरोध
- सुप्रीम कोर्टाने म्हटले की, मुलगा आणि मुलगी दोघेही एकमेंकावर प्रेम करत होते. मुलीच्या वडिलांनी कोर्टात सांगितले होते की, जात वेगळी असल्यानेच त्यांनी या लग्नाला नकार दिला होता.