आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Second Phase Of The Bihar Assembly Elections Today

बिहारमध्ये आज दुसऱ्या टप्प्यात मतदान, प्रचंड बंदोबस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी ३२ विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. यात सहा जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. या मतदारसंघांत ४५६ उमेदवार रिंगणात असून या भागात मतदान शांततेत व्हावे यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

नक्षलग्रस्त भागामुळे मतदानाचा हा टप्प अत्यंत संवेदशील मानला जातो. यात कैमूर, रोहतास, अरवाल, जेहानाबाद, औरंगाबाद आणि गया या जिल्ह्यांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात ४९ जागांसाठी मतदान झाले होते. दुस ऱ्या टप्प्यात लालू-नितीश यांच्या महाआघाडीसमोर भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मोठे आव्हान आहे. कारण, या टप्प्यात भाजपने प्रचारात प्रामुख्याने राज्याचे मंत्री लाच घेत असल्याचे स्टिंग हा प्रमुख मुद्दा लावून धरला. भ्रष्टाचारावरच आघाडीच्या नेत्यांचा प्रचारात भर होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेहानाबाद आणि भुबुआ येथे १२ ऑक्टोबरला झंझावाती दौरा करत लालू-नितीश यांच्या महाआघाडीवर जोरदार हल्ला चढवला. ११ ऑक्टोबरलाच लाच घेतानाचा वादग्रस्त मंत्र्याचा व्हिडिओ लोकांसमोर आला होता. या पार्श्वभूमीवर मोदींनीही राज्य सरकारवर प्रखर टीका केली. प्रामुख्याने भ्रष्टाचारावरच त्यांनी भाष्य केले.

२३ मतदारसंघ संवेदनशील : या टप्प्यातील मतदानात ३२ पैकी २३ मतदारसंघ अतिसंवेदनशील असून सुरक्षा व्यवस्थेसोबतच या मतदारसंघात मतदानाची वेळही १ ते दोन तासांनी कमी करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी आर. लक्ष्मणन यांनी सांगितले, सकाळी ७ वाजता सर्वच मतदान केंद्रांवर मतदार सुरू होणार असले तरी ११ मतदारसंघात ते दुपारी ३ वाजता, तर १२ मतदारसंघांत ४ वाजता थांबवले जाईल. फक्त ९ मतदारसंघांत ५ वाजेपर्यंत मतदान होईल.

महाआघाडीला प्रचंड आशा : गेल्या विधानसभा निवडणुकीत या ३२ जागांपैकी १९ जागी जदयूचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे भाजपविरोधी आघाडीला यंदाही या भागातून खूप आशा आहेत.

बॅनर्स काढले : पाटणा विमानतळ परिसरात लावण्यात आलेले सर्वच पक्षांचे पोस्टर्स व बॅनर्स गुरुवारी काढण्यात आले. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात आली. यात नरेंद्र मोदी व अमित शहा यांचे बहुतांश पोस्टर्स होते.

जात-पात न पाहता जनता बदल घडवेल
नवी दिल्ली- बिहारमध्ये जाती-पातीचा विचार न करता जनता सत्ताबदल घडवेल, असा विश्वास भाजपचे सरचिटणीस अनिल जैन यांनी गुरुवारी व्यक्त केला. अल्पसंख्याकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे प्रयत्न लालू-नितीश करत असल्याचे सांगून जनता मात्र आता सतर्क झाली असल्याचे ते म्हणाले.

बदलासाठी सज्ज व्हा : स्मृती इराणी
बिहारमध्ये महिलांची स्थिती अत्यंत वाईट असल्याचे सांगून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी या महिलांनी सत्ता बदलासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन केले. पहिल्या टप्प्यात सर्वच टप्प्यात महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे त्या म्हणाल्या.
>८६,१३,८७० एकूण मतदार
>४५६ उमेदवार

या टप्प्यातील प्रमुख उमेदवार
>माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी इमामगंजमधून लढत आहेत. विधानसभेचे विद्यमान सभापती उदय नरेन चौधरींशी (जदयू) त्यांची थेट लढत होत आहे. मकदूमपूरमधूनही ते निवडणूक लढवत आहेत.

>याशिवाय भाजप नेते व माजी मंत्री प्रेमकुमार (गया), पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष गोपाल नारायण सिंह (नबीनगर), विद्यमान मंत्री जयकुमार सिंह यांचे भवितव्य शुक्रवारी ठरेल.