बंगळुरू - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल धर्मनिरपेक्ष (जेडीएस) पक्षाचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी विधान परिषदची आमदारकी देण्यासाठी 20 कोटी रुपयांची लाच मागितल्याचे ऑडिओ सीडीतून उघड झाले आहे. यामुळे कुमारस्वामी यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
शनिवारी प्रसिद्ध झालेल्या 35 मिनिटांच्या ऑडिओ सीडीत कर्नाटक विधान परिषद सदस्य मिळवण्याच्या शर्यतीतील प्रमुख दावेदार विजापूरच्या विजूगौडा पाटील यांचे समर्थक आणि कुमारस्वामी यांच्यात चर्चा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात चर्चेची सुरुवात झाली. विजूगौडा फॅन्स असोसिएशनने सीडी जारी केली. मात्र, आपल्याला बदनाम करण्यासाठी काँग्रेसने सीडी प्रसिद्ध केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. ही सीडी प्रकाशात आल्यानंतर कर्नाटकातील राजकारण तापले आहे.
विरोधकांनी कुमारस्वामी यांना लक्ष्य केले असले तरीही सीडीमध्ये वावगे असे काहीच नाही. त्याबाबत चर्चा करण्याची आपली तयारी आहे, असे कुमारस्वामी यांचे म्हणणे आहे. या सीडीचा दुरुपयोग करून पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा हेतुत: प्रयत्न केला जात असल्याचाही त्यांचा आरोप आहे.
ऑडिओ सीडीतील संभाषण
कुमारस्वामी विजूगौडा यांच्या समर्थकाला म्हणतात की, माझ्या पक्षाचे आमदार पैशासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सांगण्यानुसार काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतात. ते माझे ऐकत नाहीत. सर्वांनी निवडणूक लढवण्यासाठी कर्ज काढले होते त्यामुळे त्यांना भरपाई करावयाची आहे. सर्व 40 आमदार प्रत्येकी एक कोटी मागत आहेत. यावर समर्थक विजूगौडांना तिकीट देण्यासाठी 40 कोटी देऊ करतो. कुमारस्वामी म्हणतात, तुम्ही 20 कोटी द्या, बाकी मी पाहून घेईन.
सगळेच राजकीय पक्ष भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. मी जी काही चर्चा केली आहे ते राजकारणातील वास्तव आहे. - एच. डी. कुमारस्वामी
भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार आहे. चूक ती चूकच. अन्य राजकीय पक्षही भ्रष्टाचार करतात, हा काही बचाव असूच शकत नाही. - सिद्धरामय्या, कर्नाटकचे मुख्यमंत्री
त्यात काय वावगे? : कुमारस्वामींचे स्पष्टीकरण
कुमारस्वामी म्हणाले, सीडीमध्ये केवळ पैशाचा उल्लेख आहे. कोणी पैसे घेतल्याचे पाहिले नाही. पैशाच्या बदल्यात आमदारकी देणे हे राजकारणातील कटू सत्य आहे. समोर वेगळे आणि मागे भलते बोलणार्यांपैकी मी नाही. मला खलनायक करणे योग्य नाही. या निवडणुकांमध्ये उर्वरित पक्षांनीही हेच केले आहे. कुमारस्वामी यांचा हा खुलासा मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना रूचलेला नाही. एखादी मांजर डोळे लावून दूध पिते याचा अर्थ ती दूध पीत आहे हे अख्खे जग पाहत नाही, असा होत नाही, असे सिद्धरामय्या म्हणाले.