आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाबोधी मंदिराची सुरक्षा होती राम भरोसे, सहज घडविता आले स्‍फोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- बुद्धगया येथील महाबोधी मंदि‍रात साखळी बॉम्‍बस्‍फोट झाल्‍यानंतर देशात खळबळ उडाली आहे. महाबोधी मंदि‍र दहशतवाद्यांचे पुढील लक्ष्‍य असू शकते, असा इशारा देण्‍यात आला होता. तरीही सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देण्‍यात आले नाही. त्‍यामुळे सहजपणे मंदिराला लक्ष्‍य करण्‍यात आले. सुरक्षेबाबत दिसून आलेली उदासिनता चिंताजनक आहे.

'दैनिक भास्‍कर'च्‍या नेटवर्कला यासंदर्भात मिळालेली माहिती सुरक्षा यंत्रणांकडे बोट दाखविणारी आहे. मंदिराच्‍या मुख्‍य प्रवेशद्वारावर लावण्‍यात आलेले मेटल डिटेक्‍टर केवळ शोभेची वस्‍तू बनले आहेत. ते अनेक दिवसांपासून खराब झाले आहे. मंदिराच्‍या मागील बाजुची भिंत असुरक्षित आहे. कोणीही तिथून कोणतेही सामान मंदिराच्‍या परिसरात आणू शकतो. प्रशासनाशिवाय मंदिर व्‍यवस्‍थापन समितीला याबाबत माहिती आहे. तरीही त्‍याबाबत कोणतीही कारवाई करण्‍यात आली नाही.

मंदिर परिसराच्‍या समोरील भागात 3 द्वार आहेत. ते पूर्णपणे असुरक्षित आहेत. मंदिराच्‍या आत रात्रीच बॉम्‍ब ठेवण्‍यात आल्‍याचा संशय आहे. महाबोधी मंदिरात नोव्‍हेंबर ते मार्च य कालावधीत जगभरातून मोठ्या संख्‍येने बौद्ध भाविक तसेच पर्यटक मोठ्या संख्‍येने येतात. सध्‍या ऑफ सिझन आहे. त्‍यामुळे फार गर्दी नव्‍हती. अन्‍यथा मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली असती.

महाबोधी मंदिर परिसरात बोधीवृक्ष, विष्‍णूपद मंदिर आणि भगवान बुद्धांची 80 फूट उंच मूर्ती आहे. श्रीलंकेच्‍या राष्‍ट्रपतींनी नुकतेच या मंदिराला सोन्‍याचा घुमट बसविला होता. विष्‍णूपद मंदिरही खूप प्राचीन आहे. बोधीवृक्षाखाली भगवान बुद्धांच्‍या पावलांचे ठसे आहेत. याच वृक्षाखाली त्‍यांना ज्ञान प्राप्‍त झाले होते. म्‍हणूनच त्‍याचे नाव बोधीवृक्ष असे पडले. काही वर्षांपूर्वी या वृक्षाच्‍या सुरक्षेबाबत चिंता व्‍यक्त करण्‍यात आली होती.