आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Seemandhra Region The Temple Of Tirupati Build Telangana

सीमांध्रातील तिरुपतीच्या तोडीचे मंदिर तेलंगणही उभारणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नलगोंडा (हैदराबाद)- सीमांध्रच्या तिरुपती बालाजी मंदिरासारख्या भव्य मंदिराची उभारणी तेलंगणात होत आहे. हे धार्मिक आस्थेपोटी होत नसून विभाजनानंतर सीमांध्रला सडेतोड उत्तर देण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ही स्पर्धा जरा विचित्र वाटत असली तरी ही वास्तविकता आहे. तेलंगणाच्या नलगोंडामध्ये स्थित यादगिरिगट्टाच्या जवळ हे मंदिर ८०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येईल. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी यासाठी मंजुरी दिली आहे. हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यादगिरिगट्टा विकास प्राधिकरण स्थापण्यात आले आहे. विश्वस्त व निवृत्त प्रशासकीय अधिकारी जी. किशन राव यांच्याकडे प्रकल्पपूर्तीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

प्रकल्पप्रमुख राव यांच्याशी चर्चा
"दिव्य मराठी'शी केलेल्या चर्चेत किशन राव यांनी प्रकल्पाविषयी सांगितले. तेलंगणाच्या सन्मानार्थ या मंदिराला भव्यता देण्यात येणार आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक आनंद साई यांनी डिझाइन तयार केले आहे. एक डिझाइन व्हॅटिकन सिटीच्या धर्तीवरही तयार करण्यात आले आहे. मात्र, अद्याप आराखड्याविषयी सहमती झालेली नाही. अत्याधुनिक सुविधांसह टेंपल सिटी विकसित करण्यात येईल. हा प्रकल्प ३ वर्षांत तडीला नेण्याचे उद्दिष्ट आहे.

०२ हजार एकरांत आठ डोंगरांवर विकसित होईल टेंपल सिटी
०१ लाख तीर्थयात्री देतील भेट. ८०० कोटींची गुंतवणूक
२००फूट उंच असेल मुख्य द्वार, याला गोपुरम म्हणतात.
५० कोटींची गुंतवणूक गोल्ड प्लेटिंगसाठी केली जाईल
टेंपल हबने आर्थिक विकासाला चालना
विभाजनानंतर तेलंगणाला आपले अाध्यात्मिक वर्चस्व अबाधित ठेवण्याची गरज वाटत असल्याचे राव म्हणाले. आमच्याकडे फक्त यादगिरिगट्टा मंदिर होते. मात्र, तिरुपतीच्या तुलनेत याचे व्यवस्थापन व्यापक नाही. तिरुपती मंदिराचे एका दिवसाचे जितके उत्पन्न आहे, तेवढे यादगिरिगट्टा मंदिराचे वर्षाचे आहे. त्यामुळे तिरुपतीच्या तोडीचे मंदिर विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
प्रवेशद्वारावर हनुमानाची विशाल प्रतिमा
या स्थळापासून हैदराबादपर्यंत ६० किमी अंतराचा चौपदरी रस्ता विकसित होत आहे. टेंपल सिटीमध्ये हेलिपॅड, ऑडिटोरियम तयार करण्यात येत आहे. एका तलावाच्या काठी पर्यटन थांबा विकसित करण्यात येईल. प्रवेशद्वारावर हनुमानाची विशालकाय प्रतिमा साकारण्यात येईल. ही प्रतिमा दूरपर्यंत दिसू शकेल.