नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तानच्या नॅशनल सेक्युरिटी अॅडव्हायजर (NSA) मध्ये होणाऱ्या चर्चेच्या तीन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये तीन तासांचे नाट्य रंगले. गुरुवारी सकाळी 9.30 च्या सुमारास पाकिस्तानने आमंत्रित केलेल्या काश्मीरच्या सर्व बड्या फुटीरतावादी नेत्यांना नजरकैद करण्यात आले होते. काही वेळानंतर जेकेएलएफचे प्रमुख यासीन मलिक यांनाही अटक करण्यात आली. पण दुपारी 12.30 पर्यंत सरकारने निर्णयावर पुन्हा यूटर्न घेतला. सय्यद अली शाह गिलानी वगळता सर्व फुटीरतावाद्यांना सोडण्यात आले. यासीन यांचीही सुटका झाली.
प्रकरण काय?
- मंगळवारी सायंकाळी : भारताचे एनएसए अजित डोभाल आणि पाकिस्तानचे एनएसए सरताज अजिज यांच्यात 23-24 ऑगस्ट रोजी दिल्लीत चर्चा होणार आहे. पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दपल बासीत यांनी मंगळवारी रात्री काश्मीरच्या फुटीरतावाद्यांना २३ ऑगस्ट रोजी जेवणासाठी निमंत्रण पाठवले. म्हणजे ज्या दिवशी NSA बरोबर भेट होणार त्याच दिवशी पाकला फुटीरतावाद्यांनाही भेटायचे आहे.
- बुधवारी दुपारी : फुटीरतावाद्यांनी पाकिस्तानच्या उच्चायुक्तांचे निमंत्रण स्वीकारले. त्यावर भारताने याप्रकाराच्या कृत्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला.
- गुरुवारी सकाली 9:30 वाजता : जम्मू-काश्मीर सरकारच्या इशाऱ्यावर पोलिसांनी फुटीरतावादी नेते यासीन मलिक, मीरवाइज उमर फारुक, सय्यद अली शाह गिलानी यांना नजरकैद केले. त्या सर्वांना पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी निमंत्रण मिळाले आहे. श्रीनगरसह संपूर्ण काश्मीरमध्ये बड्या फुटीरतावादी नेत्यांच्या घराबाहेर पोलिस तैनात करण्यात आले. 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा झेंडा फडकावणार्या आसिया अंद्राबीच्या घरावरही छापा मारण्यात आला.
- गुरुवारी दुपारी 12:30 वाजता : तीन तासांनंतर गिलानी वगळता सर्वांना अचानक सोडून देण्यात आले. त्यावर सवाल उपस्थित करण्यात आले. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले, मुफ्ती मोहम्मद सईद यांना त्यांच्या मालकांच्या आदेशावरून हुर्रियत नेत्यांना अटक करण्याशिवाय दुसरे काही काम नाही का? केंद्रानी सांगितले की अटक करायची आणि केंद्राने सांगितले की पुन्हा सोडून द्यायचे.
या मुद्यावर माजी अधिकारी आणि पाकिस्तानात भारताचे उच्चायुक्त राहिलेले जी पार्थसारथी बुधवारी म्हणाले होते की, पाकिस्तान केवळ जगाला दाखवण्यासाठी चर्चा करतो. त्यातून मार्ग काढायची त्यांची इच्छ नाही. पण ही चर्चा रद्द करायला नको. त्याऐवजी फुटीरतावाद्यांना तुरुंगात डांबून चर्चा सुरू ठेवायला हवी.
भारताला का रद्द करायची नाही चर्चा?
- भारताने पाकिस्तानला जगासमोर उघडे पाडण्याची तयारी केली आहे. बैठक रद्द करून पाकिस्तानला जबाबदारी झटकण्याची संधी द्यायची नाही, अशी भारताची इच्छा आहे. त्यासाठी 23-24 ऑगस्टची बैठक रद्द न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्यावेळी फॉरेन सेक्रेटरी स्तरावरील चर्चा फुटीरतावाद्यांची भेट घेतल्यानेच रद्द करण्यात आली होती.
- परराष्ट्र मंत्रालयाचे एक अधिकारी म्हणाले की, उफामध्ये पाकिस्तान भारताच्या दबावात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा अशी आहे की, ते चर्चेला तयार होणार नाही, असे पाकला वाटले होते. त्यामुळे भारत चर्चेला तयार नाही, असे जगाला सांगता येईल, अशी त्यांची भूमिका होती. पण मोदींनी नवाज शरीफ यांच्याबरोबर चर्चाही केली आणि NSA स्तरावरील चर्चेलाही तयार झाले. त्यामुळे स्वतः अडकत असल्याचे जाणवल्याने पाकिस्तानने एक एक चाल खेळायला सुरुवात केली आहे.
- या अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद आणि चर्चा एकत्र सुरू राहू शकत नाही, ही भारताची भूमिका आहे. दहशतवादावर चर्चा होऊ शकत नाही, असे मात्र भारताने कधीही म्हटले नाही. बैठक रद्द करायची असेल तर पाकिस्तानेच जगाला सांगावे की त्यांना दहशतवाद पोसायचा आहे आणि शांतता चर्चेची त्यांची तयारी नाही.