आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार : महाबोधी मंदिरावर दहशतवादी हल्‍ला, मुंबई आणि पुण्‍यासह आठ शहरांना धोका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गया - बुद्धगया येथे आज (रविवार) सकाळी महाबोधी मंदिर परिसर 9 साखळी स्‍फोटांनी हादरला. या स्‍फोटांमध्‍ये 5 जण जखमी झाले असून मंदिराच्‍या परिसरातून 2 जिवंत बॉम्‍ब आढळून आले आहेत. ते निकामी करण्‍यात यश आले आहे. हा दहशतवादी हल्‍ला असल्‍याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्‍पष्‍ट केले आहे. स्‍फोटांमुळे महाबोधी वृक्षाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने हल्‍ल्‍यात प्राणहानी झालेली नाही. दोन परदेशी बौद्ध भिख्‍खू मात्र गंभीर जखमी आहेत. दहशतवादी हल्‍ल्यासंदर्भात इशारा देण्‍यात आला होता. परंतु, तो गांभीर्याने घेण्‍यात आला नसल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. मंदिराच्‍या सुरक्षेत अनेक ठिकाणी त्रुटी आढळल्‍या आहेत. आता केंद्रीय गृह मंत्रालयाने 8 शहरांना धोक्‍याचा इशारा दिला आहे. ही शहरे आहेत, मुंबई, दिल्‍ली, चेन्‍नई, बंगळुरु, पुणे, अहमदाबाद, कोलकाता आणि हैदराबाद. या शहरांमधील बौद्ध स्‍मारकांसह सर्व धार्मिक स्‍थळांची सुरक्षा वाढविण्‍याचे निर्देश देण्‍यात आले आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्‍हणजे, एका वृत्तासंस्‍थेच्‍या माहितीनुसार या हल्‍ल्‍यामागे इंडियन मुजाहिदीनचा हात असून महाबोधी मंदिराची तब्‍बल 15 दिवस रेकी करण्‍यात आली होती. इंडियन मुजाहिदीननेच असा दावा या केला आहे. दरम्‍यान, बिहारचे मुख्‍यमंत्री नितीशकुमार यांनी महाबोधी मंदिरात पाहोचून परिस्थितीची पाहणी केली. दहशतवादी हल्‍ल्‍याचा त्‍यांनी तीव्र शब्‍दांमध्‍ये निषेध केला.

हल्‍ल्‍यामध्‍ये 8 ते 12 जणांचा सहभागी असल्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात आली आहे. हे दहशतवादी गया येथेच लपून बसल्याचा संशय असून शहरात व्‍यापक शोध मोहिम राबविण्‍याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. स्‍फोटामध्‍ये अमोनियम नायट्रेटचा वापर करण्‍यात आल्‍याची माहितीही पोलिसांनी दिली.

इशारा होता, मग चुकले कुठे?

दिल्‍लीत अटक करण्‍यात आलेल्‍या दहशतवाद्यांनी पुढील लक्ष्‍य महाबोधी मंदिर असल्‍याची माहिती दिली होती. पुण्‍यातील जर्मन बेकरी बॉम्‍बस्‍फोटांप्रकरणाच्‍या तपासात महाबोधी मंदिराला धोका असल्‍याचा इशारा मिळाला होता. या्प्रकरणी अटकेत असलेल्‍या सय्यद मकबूलसह, इमरान, इरफान तसेच असद या आरोपींनीही यासंदर्भात माहिती दिली होती. या आरोपींनी महाबोधी मंदिराची रेकीही केली होती. बिहार पोलिसांनी हा इशारा गांभीर्याने घेतला नाही.

महाराष्‍ट्रात हायअलर्ट

महाबोधी मंदिरावर झालेल्‍या या हल्‍ल्यानंतर महाराष्‍ट्रातही हायअलर्टचा इशारा देण्‍यात आला आहे. राज्‍यातील धार्मिक स्‍थळांची सुरक्षा वाढविण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. नागपुरातील दीक्षाभूमी, संघ मुख्‍यालय, रेशीमबाग येथील हेडगेवार भवन तसेच इतर काही ठिकाणी सुरक्षा वाढविण्‍यात आली आहे.

इंडियन मुजाहिदीनकडे संशयाची सुई

प्राप्त माहितीनुसार स्फोटांची तीव्रता जास्त नव्हती. केंद्रीय राखीव पोलिस दल आणि अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना गया मेडीकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. महाबोधी मंदिराला रिकामे करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, तपास सुरु करण्यात आला आहे. तपासांतीच स्फोटांचे नेमके कारण स्पष्ट करता येईल. मंदिराच्‍या परिसरात 4 स्‍फोट झाले. तर 3 स्‍फोट कर्मापा मंद‍िरात झाले. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा दशतवादी हल्‍लाच असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. दहशतवाद्यांनी सुरक्षेतील त्रुटी शोधून मोक्‍याची वेळ साधून बॉम्‍ब ठेवले. या हल्‍ल्‍यात 5 जणांनी सहभाग घेतला असावा, अशी शक्‍यता आहे. तसेच भल्‍या पहाटे बॉम्‍ब ठेवण्‍यात आले असावेत, असाही संशय आहे.

महाबोधी मंदिर परिसरात सकाळी 5.30 ते 5 58 वाजेपर्यंत हे स्फोट झाले. त्यावेळी मंदिरात भंतेजी आणि सफाई कामगार होते. ज्या ठिकाणी स्फोट झाले तेथेही जास्त गर्दी नव्हती त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मंदिराचे कोणतेही नुकसान झालेले नाही. म्‍यानमार आणि तिबेटच्‍या प्रत्‍येकी एका भिख्‍खूचा समावेश आहे.

बुद्धगया नक्षलप्रभावित क्षेत्र मानले जाते. त्यामुळे या स्फोटांमागे नक्षलवाद्यांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. फॉरेन्सिक लॅबची टीमही पाटण्याहून घटनास्थळी दाखल झाली आहे. पाटणा ते बुद्धगया हे जवळपास 110 किलोमीटरचे अंतर आहे.

भगवान बु्द्धांना ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झाली होती, ते हेच ठिकाण आहे. त्यामुळे बुद्धगया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी आणि पर्यटक येत असतात. मुख्यतः जपान आणि पूर्व आशियामधून येथे श्रद्धाळू येतात. येथील मंदिर हे शेकडो वर्षांपू्र्वीचे असून त्याला जागितक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त आहे. पहाटे 4 वाजताच पूजा सुरु होते. त्‍यामुळे सकाळच्‍या वेळेत बौद्ध भिख्‍खुंची गर्दी असते. त्‍यांनाच लक्ष्‍य करण्‍यात आले आहे.