हरिद्वार/झांशी - शिर्डीतील साईबाबांच्या भक्तीवरून भक्त व शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्यातील वाद वाढतच आहे. साईबाबांच्या पूजेच्या समर्थनासाठी सरसावलेल्या केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यावर शंकराचार्य चांगलेच भडकले. उमा मुसलमानाची पूजा करतात. त्यामुळे प्रभू रामचंद्र त्यांच्यावर नाराज आहेत, अशा शब्दांत शंकराचार्यांनी उमांवर हल्ला चढवला आहे.
हा वाद सुरू असतानाच हरिद्वारमध्ये संतांच्या बैठकीत उमा भारतींच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी झाल्याचे समजते. सार्इंनी स्वत:ला देव कधी म्हटले नव्हते, असे म्हणत उमा भारतींनी या वादात उडी घेतली होती.
मुस्लिम भाविकांचा मोर्चा : मुस्लिम महिला साईभक्तांनी रविवारी शिर्डीत मोर्चा काढला. शंकराचार्यांच्या प्रतिमेला बांगड्यांचा आहेर केला. शबाना सय्यद यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शंकराचार्यांनी माफी मागण्याची मागणी झाली.
धर्माच्या भानगडीत पडू नका
उमा भारती रामभक्त नाहीत. त्या मुसलमानाची पूजा करतात. साई मुसलमान होते. राममंदिर मोहिमेत उमांच्या अपयशाचे कारण साईभक्तीतच आहे. प्रभू रामचंद्र त्यांच्यावर नाराज आहेत. उमा यांना जनतेने शासक म्हणून निवडले आहे. धर्माच्या भानगडीत त्यांनी पडू नये. उमा मंत्री आहेत, कोणी देव नाहीत. - शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती, द्वारका व ज्योतिषपीठ
शंकराचार्यांना पत्र
शंकराचार्य आपल्याला पित्यासमान आहेत. मी त्यांचा आदर करते. त्यामुळे वाद वाढवायचा नाही, असे उमा भारती यांनी झाशी येथे सांगितले. तथापि, त्यांनी शंकराचार्यांना पत्र पाठवले असून, त्यात सार्इंनी स्वत:ला देव म्हणवून घेतले नसल्याचे म्हटले आहे.
(फोटो - संग्रहित छायाचित्र)