आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जदयूतून शरद यादव समर्थक 21 नेत्यांचे निलंबन; रमई राम यांचाही समावेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - जनता दल युनायटेडने (जदयू) बंडखोरीच्या मार्गावर असलेले शरद यादव यांच्या समर्थकांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचे काम सुरू केले आहे. प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांनी सोमवारी माजी मंत्री रमई राम, माजी खासदार अर्जुन राय, विधान परिषदेचे माजी आमदार विजय वर्मा तसेच माजी आमदार राजकिशोर सिन्हा यांच्यासह राज्यातील २१ नेत्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान, शरद यादव यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी १९ ऑगस्ट रोजी जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीस आमंत्रित करण्यात आले आहे. ते या बैठकीस अनुपस्थित राहिल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

जदयूचे बिहारचे सरचिटणीस अनिलकुमार म्हणाले की, जिल्हा कार्यकारिणीच्या अनेक नेत्यांविरोधात कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती. १० ते १२ ऑगस्टदरम्यान बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शरद यादवांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचा या नेत्यांवर आरोप आहे.

तत्त्पूर्वी, जदयूने अरुण श्रीवास्तव यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदावरून बडतर्फ केले, तर राज्यसभा खासदार अली अन्वर यांना संसदीय दलातून निलंबित केले. शरद यादव यांच्याकडून राज्यसभेचे नेतेपद काढून घेतले होते.

लालूप्रसाद यादव यांच्या सतत संपर्कात  
त्यागी पुढे म्हणाले, शरद यादव हे लालूप्रसाद यादव यांच्या सतत संपर्कात आहेत. २७ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय जनता दलाने आयोजित केलेल्या ‘भाजप भगाओ’ रॅलीतही ते सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दुसरीकडे त्यांनी १९ ऑगस्ट रोजी जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत येण्यास नकार दिला आहे.

जदयूत राहून शरद यादव मुख्यमंत्री नितीशकुमार आणि त्यांचे सरकार अस्थिर बनवणाऱ्यांना साथ देत आहेत. जदयू नितीशकुमारांच्या नेतृत्वात एकजूट असून शरद यादवांसोबत कोणताही आमदार किंवा नेता नाही. शिवाय लोकसभेतील दोन्ही खासदारही नितीशकुमारांसोबत आहेत. राज्यसभेचे खासदार अन्वर अली वगळता अन्य सर्व खासदारांचाही नितीशकुमार यांनाच पाठिंबा असल्याचेही त्यागी यांनी आवर्जून सांगितले.
 
बाहेर पडण्याचा निर्णय स्वत: शरद यादवांचाच : त्यागी  
जदयूचे प्रमुख राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. त्यागी यांच्या मते, शरद यादव यांनी जदयूतून बाहेर पडण्याचा मार्ग स्वत:हून निवडला. आम्ही त्यांना पक्षातून काढण्याबाबत विचारही करू शकत नाही. पण ते स्वत:च पक्षविरोधी काम करू लागले. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची वेळ येऊ नये, अशी आमची इच्छा होती. मात्र, तेच पक्षाच्या विरोधात जाऊन आघाडीविरोधात मत प्रदर्शित करत होते. कधी लालूप्रसाद यादव यांची प्रशंसा करत होते, तर कधी राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका घेत होते.
 
 
बातम्या आणखी आहेत...