आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशिकला बडदास्त प्रकरण : माजी सनदी अधिकारी करणार चौकशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- कर्नाटक पोलिस दलात सध्या प्रचंड खळबळ माजली आहे. अण्णा द्रमुकच्या नेत्या शशिकला यांची तुरुंगात चांगलीच बडदास्त सुरू असल्याचा अहवाल तुरुंग प्रशासनाच्या उपमहासंचालक डी. रूपा यांनी दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. अशातच कर्नाटक सरकारने या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी निवृत्त सनदी अधिकारी विनय कुमार यांची नियुक्ती केली आहे. 

 डी. रूपा यांनी त्यांच्या अहवालातून तुरुंग प्रशासनाचे पोलिस महासंचालक एच. एन. सत्यनारायण राव यांच्यावर २ कोटींची लाच घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर डी. रूपा यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे, तर राव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. बंगळुरू मध्यवर्ती कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांचीही बदली करण्यात आली आहे.  

दरम्यान, डी. रूपा यांच्या बदलीमुळे कर्नाटकातील विरोधी पक्षांनी रणकंदन माजवले आहे. याचे पडसाद लोकसभेतही उमटले. कर्नाटकमधील भाजप खासदारांनी “प्रामाणिक अधिकाऱ्यांचे रक्षण करा’ अशा अाशयाची पोस्टरबाजी केली. विनय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या गृह मंत्रालयाकडून मला सोमवारपासूनच चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, चौकशीचा अहवाल सरकारला कधीपर्यंत सोपवायचा आहे याच्या मुदतीविषयी त्यांनी काहीच माहिती दिली नाही. 

शशिकला यांना तुरुंगात व्हीव्हीआयपी सुविधेचे प्रकरण 
अण्णा द्रमुकच्या नेत्या शशिकला यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ४ वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला असून त्या बंगळुरूच्या पराप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात कैदेत आहेत. मात्र, त्यांच्यासाठी कारागृहात विशेष भोजन कक्ष बांधण्यात आला असून यासाठी शशिकला यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना २ कोटी रुपये पुरवले असल्याचे डी. रूपा यांनी या कारागृहाची तपासणी केल्यानंतर दिलेल्या अहवालात म्हटले आहे. कर्नाटकच्या तुरुंग प्रशासनाचे पोलिस महासंचालक एच. एन. सत्यनारायण राव यांच्यावरही त्यांनी लाचखोरीचे आरोप केले आहेत.