आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देहव्यापारप्रकरणी अभिनेत्री श्वेता बसूचे पत्राद्वारे माध्यमांना खुले आव्हान, बातम्या सिद्ध करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - देहव्यापारप्रकरणी हैदराबाद सत्र न्यायालयाने क्लीन चिट दिल्यानंतर अभिनेत्री श्वेता बसूने माध्यमांनी तिच्या चारित्र्यावर केलेल्या धूळफेकीबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ऑगस्ट महिन्यात या प्रकरणी अटक झाल्यानंतर श्वेता बसू दोन महिने सुधारगृहात होती. दरम्यानच्या काळात श्वेता स्वेच्छेने या व्यवसायात उतरली असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसारित झाले होते. या बातम्या माध्यमांनी सिद्ध कराव्यात, असे खुले आव्हान तिने एका पत्राद्वारे दिले आहे.

श्वेताचे पत्र
> माध्यमे माझ्यासाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहिली आहेत. मात्र तुम्ही लोकांनी माझ्या वैयक्तिक आयुष्याचा संपूर्ण विचका केला आहे. धन्यवाद!
>अशा प्रकारच्या घटनांचा बोभाटा होतो, हे समजू शकते. त्याच्यावर तत्काळ प्रतिक्रिया उमटतात, हे पण मला मान्य आहे. पण वक्तव्याचं काय? माझ्या नावे ते कसं प्रसारित झालं ?
>माझ्या नावे प्रसारित करण्यात आलेलं विधान कोणाच्या कल्पनेतून आलं? तुम्ही कामाच्या ठिकाणी आरामात धूम्रपान करत करत हा डायलॉग माझ्या तोंडी टाकलाय का? ८० च्या दशकातील एखाद्या बॉलीवूड पटासारखा तो डायलॉग आहे.या विधानात इतके ‘अँड’(आणि )कोणी जोडले आहेत?
>माझे कुटुंब, मित्रपरिवार व निकटवर्तीयांची मी ऋणी आहे. त्यांनी खोट्या विधानांवर विश्वास ठेवला नाही. मी असे बोलूच शकत नाही, याबद्दल ते आश्वस्त होते. पण इतर लोकांना मी सांगू
इच्छिते, हे माझे विधान नाही.
>मी सहानुभूती मिळवू इच्छित नाही. ती समाज मला देईल. मात्र एक २३ वर्षीय तरुणी अशा खोट्या बातम्यांना बळी पडली आहे व ती खंबीरपणे याचा जाब विचारतेय, हे कदाचित आपल्या समाजाच्या पचनी पडणार नाही.
>हैदराबादच्या प्रज्वला सुधारगृहात २ महिने मी तेथील मुलांना संगीत शिकवले व १२ चांगली पुस्तके वाचून काढली. ३० ऑक्टोबरला मी मुंबईत घरी परतल्यावर मला माध्यमांच्या विकृत बातम्यांनी व्यथित केले.
>पोलिसांनी माझे वक्तव्य सांगितल्याचे मला सांगण्यात आले. मात्र हैदराबादच्या पोलिसांनी याचा स्पष्ट इन्कार केला. पोलिसांकडून कोणतीही अधिकृत प्रेसनोट दिली गेली नव्हती. अशा प्रकरणांत आरोपीची आेळख उघड करण्याची पोलिसांना कायद्याने परवानगीच नसते.

माध्यमांमधील यापूर्वीचे श्वेताचे विधान
माझ्या करिअरमध्ये चुकीचे पाऊल उचलले आणि हे पैशासाठीच केले. माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. सगळ्या संधी माझ्यासाठी बंद आहेत आणि काही लोकांनी मला देहविक्रीसाठी प्रोत्साहित केले. कोणताच मार्ग न सापडल्याने मी इकडे वळले. अशा प्रकरणात अडकलेली मी एकटीच अभिनेत्री नाही, अनेक आहेत.

माझ्यासाठी हे प्रकरण इथेच संपले...
या खुल्या पत्रामध्ये श्वेता बसू प्रसाद हिने आपल्या करिअरची व इक्बाल चित्रपटातील (२००५) भूमिकेनंतरच्या प्रत्येक असाइनमेंटची सविस्तर माहिती दिली आहे. सुसंस्कृत कौटुंबिक व शैक्षणिक पार्श्वभूमीचा तपशीलही तिने दिला आहे. खुल्या पत्राच्या शेवटी हे प्रकरण माझ्यासाठी येथेच संपले आहे. मात्र माध्यमांनी या प्रकरणी आपली विश्वासार्हता सिद्ध करून दाखवावी, असे आवाहन श्वेताने केले आहे.

मी कोणतीही कबुली दिली नव्हती
मला हॉटेलमधून ताब्यात घेतल्यावर माझी रवानगी सुधारगृहात झाली. तेथे मी ५९ दिवस होते. मी असे वक्तव्य कधी दिले आणि माध्यमांना हे कोणी सांगितले, असा सवाल श्वेताने विचारला आहे. माझा फोन जप्त करण्यात आला होता. त्यापूर्वी मी माझ्या आईशी व जवळच्या मित्रपरिवाराशी संवाद साधला होता. माझा वृत्तपत्र, टीव्ही, इंटरनेट वा रेडिआे या कोणत्याही माध्यमाशी किंवा त्यांच्या प्रतिनिधींशी गेल्या २ महिन्यांपासून संपर्कच नाही, असे माध्यमांना लिहिलेल्या खुल्या पत्रात श्वेताने म्हटले आहे.

अटकेचे शुक्लकाष्ठ
-३१ ऑगस्ट २०१४ रोजी हैदराबादमध्ये वेश्या व्यवसायाच्या आरोपाखाली श्वेता बसूला अटक करण्यात आली.
-अटकेनंतर श्वेताला दोन महिन्यांकरिता सुधारगृहात पाठवण्यात आले.
-या दरम्यान माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, श्वेताने स्वत:वरील आरोप मान्य केले असून बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींवर वेश्या व्यवसाय करण्याची वेळ आली असून ही सर्वसामान्य बाब असल्याचे तिचे म्हणणे आहे..
-नोव्हेंबर महिन्यात सुधारगृहातून परतल्यानंतर श्वेताने आपण हे आरोप मान्य केल्याचे वृत्त फेटाळून लावले.
-हैदराबाद सत्र न्यायालयात श्वेताच्या आईने दाखल केलेल्या याचिकेनंतर ५ डिसेंबर रोजी कोर्टाने या प्रकरणी श्वेताला क्लीन चिट दिली.
माध्यमांनी खुलासा करावा : माझ्यासोबत हॉटेल रूममध्ये कोणी उद्योजक सापडला, हेही प्रसिद्ध झालंय. कोण आहे तो? माध्यमांना त्याचं नाव माहीत नाही का? माहीत असेल तर मलाही सांगा.

कोण आहे श्वेता बसू ?
 वयाच्या ११ व्या वर्षी ‘मकडी’ या चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेतून श्वेता बसूने २००२ मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. यासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. श्वेता ही मूळची जमशेदपूर येथील रहिवासी. आई सरस्मिता बंगाली आणि वडील अनुज हे बिहारचे.
 त्यानंतर ‘कहानी घर घर की’ या मालिकेतूनही ती बालकलाकाराच्या रूपात घरोघरी पोहोचली. २००५ मध्ये ‘इक्बाल’ या चित्रपटात तिने श्रेयस तळपदेच्या बहिणीची भूमिका केली.
 २००८ मध्ये श्वेताने ‘कोथा बंगारू लोकम’ या तेलगू चित्रपटात प्रथमच मुख्य अभिनेत्रीची भूमिका केला. वरुण संदेश या सहकलाकारासोबत चित्रित झालेल्या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती अनेक चित्रपटांत झळकली, पण तेलगू चित्रपटासारखे यश पुन्हा मिळवू शकली नाही.