तिरुवनंतपुरम - अल्पसंख्यांकाशी जवळिकीमुळे काँग्रेस पक्षाच्या धर्मनिरपेक्षतेबद्दल लोकांच्या मनात संशय निर्माण झाला, असा घरचा आहेर पक्षाचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांनी दिला आहे.
तिरुवनंतपुरममध्ये सी. के. गोविंद नायर यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अँटनी म्हणाले की, काँग्रेस पक्ष काही विशिष्ट समुदाय अथवा संघटनांकडे झुकला असल्याचा समज समाजातील काही लोकांमध्ये झाला. सर्वांना समान न्याय हे काँग्रेसचे धोरण आहे, पण या धोरणाची अंमलबजावणी होत आहे की नाही याबाबत लोकांच्या मनात संशय होता. अल्पसंख्याक समुदायांशी पक्षाची जवळीक असल्याने हा संशय निर्माण झाला आणि अशा परिस्थितीमुळे केरळमध्ये जातीयवादी पक्षांसाठी दरवाजे उघडले गेले.
काँग्रेसचे सरकार असताना काही विशिष्ट समुदायांकडे विशेष लक्ष दिले जाते हा समज दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. कोणताही पक्ष अथवा सरकार देशातील एखाद्या विशिष्ट समुदायासाठी काम करत असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण करणारी परिस्थिती राजकीय पक्षांनी निर्माण होऊ देऊ नये, असा सल्लाही अँटनी यांनी दिला. अँटनी यांना स्पष्ट बोलण्याची सवय असल्याचे काँग्रेस आमदार टी. एन. प्रतापन म्हणाले. काही विशिष्ट शक्ती पक्षाचा धर्मनिरपेक्ष पाया कमकुवत करत असल्याची अँटनी यांची भावना झाली आहे. केरळमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या प्रतिक्रियेकडे पाहायला हवे, असेही ते म्हणाले.
वक्तव्याला हा आधार
केरळात काँग्रेसच्या सरकारमध्ये केरळ काँग्रेस ही स्थानिक ख्रिश्चन पार्टी आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग यांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे केरळमधील काँग्रेस सरकार अल्पसंख्याक पक्षच चालवत असल्याचा समज निर्माण झाला.