आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोपाळ येथे स्मार्ट डस्टबिन; भरल्यानंतर ट्विट करून बोलावेल कचरागाडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- स्मार्ट शहरांसाठी मध्य प्रदेशातील दोन आयटी तंत्रज्ञांनी स्मार्ट डस्टबिन तयार केली आहे. ती कचऱ्याने भरल्यानंतर स्वत: आपले स्टेटस टि्वट करून महापालिकेची गाडी मागवेल. अशा प्रकारची ही देशातील पहिली डस्टबिन असल्याचा त्यांचा दावा आहे. या डस्टबिनचा दरमहा देखभाल खर्च १०० रुपयांपेक्षा कमी आहे.  सुमीत मिढा आणि विपिन ढिंगरा यांनी ती तयार केली आहे.  

दोन वर्षांपूर्वी एका अमेरिकन कंपनीने पुण्यात प्रस्तावित स्मार्टसिटीसाठी याचे सादरीकरण दाखवले होते, परंतु याचा खर्च जास्त येत असल्याने त्यांचा प्रस्ताव नाकारण्यात आला.  त्यानंतर त्यांनी अशा प्रकारची डस्टबिन तयार करण्याचे काम सुरू केले. ते पूर्ण झाल्यानंतर याची औपचारिक चाचणी घेण्यात आली.  

२ लाखांची मशीन ४० हजारांत, उत्पादन वाढले तर खर्च कमी  
ई-डस्टबिनचे सादरीकरण २०१५ मध्ये बिग बेली या अमेरिकन कंपनीने पुणे महानगरपालिकेत दिले होते. यासाठी २ लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले होेते. किंमत जास्त असल्याने पुणे महापालिकेने ती घेण्यास नकार दिला. सुमीत आणि विपिन यांनी दोन वर्षांत केवळ २० टक्के खर्चात ही डस्टबिन तयार केली. मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यास यासाठी २० हजार रुपये इतका खर्च येईल.  

डस्टबिनचे कार्य 
 स्मार्ट डस्टबिनमध्ये एक चिप बसवण्यात आली आहे. यामध्ये बसवलेल्या दुसऱ्या सेन्सरद्वारे आपले स्टेटस ती टि्वटरवर अपडेट करते. प्रत्येक डस्टबिनला स्वतंत्र कोड आहे.
उदा.  आयबिन- १, आयबिन -२ आयबिन-३  ही मशीन आपले लोकेशन स्वत: दाखवते. ती भरताच टि्वटरवर भरल्याचे स्टेटस पाठवते.  

जीपीएस : डस्टबिनमध्ये जीपीएस बसवण्यात आले आहे. जर कोणी ती उचलून नेण्याचा प्रयत्न केल्यास स्वत:च लोकेशन दाखवेल.  
सेन्सर : जर कोणी तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्यास सेन्सरमुळे अलार्म वाजू लागतील.
बातम्या आणखी आहेत...