आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझा मुलगा प्रयोगशाळेत तरी जिवंत राहील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - ‘आम्ही आमच्या मुलाचा देह सोपवला आणि त्यांनी आम्हाला एक ख्रिसमस ट्री दिला. आता माझा मुलगा त्यांच्या प्रयोगशाळेत आणि हे रोप आमच्या घरी कायमचे जिवंत राहील,’ असे म्हणणार्‍या किश्वर अहमद शिराली यांना ख्रिसमस ट्रीमध्ये आपल्या मुलाचे प्रतिबिंब दिसते. त्यांच्या डोळ्यांत आसवे नाही, तर अपार समाधान झळकत आहे.

76 वर्षांच्या या आईने आपला मुलगा अलिफ नीलेश शिरालीच्या मृत्यूनंतर त्याचे शरीर चंदिगडच्या पीजीआयला (पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था) दान केले आहे. किती अवघड होते हा निर्णय घेणे..? त्या सांगतात की, अवघड नव्हते. त्याचे शरीर चितेला किंवा कबरीत किड्यांना सोपवण्यापेक्षा माणसांना उपयोगी पडणे कितीतरी चांगले. आधी माझा मुलगा वॉल स्ट्रीटवर काम करत होता, आता पीजीआयमध्ये भावी डॉक्टरांना शिकवतोय. किश्वर शिराली हिमाचल प्रदेश विद्यापीठातील मानसशास्त्र विभागातून आणि त्यांचे पती डॉ. सतीश शिराली पंजाब विद्यापीठातील गणित विभागातून निवृत्त झाले आहेत. अध्यात्माशी गहिरे नाते असलेल्या किश्वर मृतात्म्याची शांती व मुक्तीच्या सर्व कल्पना फेटाळून लावतात. त्या म्हणतात की, आपण माणूस असूनही मानवतेसाठी काही करू शकलो नाही, तर हा सर्वात मोठा अधर्म आहे.

माणुसकी हाच मोठा धर्म
कुटुंबीय, नातेवाईक आणि समाजाचा देहदानाबद्दल काय दृष्टिकोन आहे? किश्वर म्हणाल्या की, माझ्या निर्णयाला माझ्या कुटुंबीयांचा पाठिंबा होता. नातेवाइकांच्या भावना माझ्या बाजूने होत्या आणि समाजाला वाटत होते की, या घरात मृत्यूनंतर कसलेही शांती पठण किंवा उत्तरक्रिया वगैरे का होत नाही? ज्यांनी दु:खात आम्हाला साथ दिली त्यांचे आम्ही आभार व्यक्त केले आणि इतरांनाही सांगितले.

पैसे कमावून सोडून जाणे जीवनाचा उद्देश नाही
धर्मशाळेजवळ एक मातीचे घर बांधून तेथे किश्वर राहताहेत. त्या मुलांसाठी हेल्प फाउंडेशन ही संस्था चालवतात. आयुष्याचा खरा उद्देश पैसे कमवून इतरांसाठी सोडून जाणे असा नसतो, तर आपण गेल्यानंतर लोकांनी आपल्याला लक्षात ठेवावे आणि आपल्याकडून काही शिकावे, असे कार्य म्हणजे जीवन होय.

मुलाच्या मृत्यूनंतर 2 दिवसांनी अपडेट फेसबुक स्टेटस
धैर्य आणि मानवी उत्तुंग भावनेचा आदर्श असलेल्या या आईने 28 एप्रिल रोजी फेसबुक वॉलवर लिहिले.. अलिफचा 47 वा वाढदिवस 25 एप्रिल रोजी होता. 26 रोजी तो आम्हाला सोडून गेला. आम्ही त्याचा देह पीजीआयला दान केला. आता तो विद्यार्थ्यांना शिकवील.