आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनियांविरुद्ध साध्वी प्राची भाजपच्या उमेदवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून - उत्तर प्रदेशच्या रायबरेली मतदारसंघात कॉँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्ध भाजप साध्वी डॉ. प्राची यांना उमेदवारी देणार आहे. त्याआधी उमा भारती यांच्या नावाचा विचार झाला होता. मात्र, रायबरेलीतील समीकरणे पाहता साध्वी प्राची यांचे नाव जवळजवळ निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. उमा भारती यांची त्याआधीच झांसीतून उमेदवारी जाहीर झाली होती. उच्चसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साध्वी प्राची उच्चशिक्षित आहेत. उत्तर प्रदेशमधील बागपतच्या रहिवासी असलेल्या प्राची मुजफ्फरनगर दंगलीच्या आधी झालेल्या महापंचायतमध्ये समोर आल्या होत्या.


कोण आहेत साध्वी प्राची : साध्वी ऋतुंभराची गुरू बहीण साध्वी प्राची तीन विषयांत एमए आहे. प्राचींनी वेदांवर डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे. आर्य समाजाशी संबंधित साध्वी प्राची यांनी हरियाणाच्या करनाल येथील महिला गुरुकुल कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून काम केले आहे. प्राची पुरकाजीतून भाजपच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली आहे. यात त्यांचा पराभव झाला होता.


वाईट अर्थव्यवस्थेला चिदंबरम जबाबदार : यशवंत सिन्हा
भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी वाईट अर्थव्यवस्थेला अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना जबाबदार धरले आहे. त्यांनी चलनवाढ, विकास आणि रोजगाराशी संबंधित 18 प्रश्नांवर चिदंबरम यांच्याकडे उत्तर मागितले आहे. यूपीए सरकारच्या दहा वर्षांच्या कुशासनामुळे आर्थिक दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली काय? असा सवाल त्यांनी केला. सलग सात महिने जीडीपी विकास दर 5 टक्क्यांच्या खाली राहिला. चालू आर्थिक वर्षाच्या तिस-या तिमाहीमध्येजीडीपी दर 4.7 टक्के होता. रोजगार निर्मितीच्या मुद्द्यावर एनएसएसओ सर्वेक्षणाचा दाखल देत सिन्हा म्हणाले, 1999 ते 2004 दरम्यान 6 कोटींहून अधिक नोक-यांच्या संधी निर्माण झाल्या.


60 वर्षांत प्रति खासदार मतदारांच्या संख्येत साडेचारपट वाढ
स्वातंत्र्यानंतर देशात झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत आता प्रति खासदार सरासरी मतदारांची संख्या साडेचारपट वाढली आहे. सध्याची निवडणूक स्वातंत्र्यानंतरची 16 वी निवडणूक आहे. 1951 मध्ये पहिल्या निवडणुकीत प्रति खासदार सरासरी मतदारांची संख्या 3.5 लाख होती, 2014 मध्ये त्यात वाढ होऊन 15.5 लाख झाली. याबरोबर देशभरात निवडणुकीत भाग घेणा-या एकूण मतदारांची संख्या 1951 च्या 17.3 कोटींहून 83.9 कोटी झाली.


सोनिया लुटारू स्नुषा : रामदेवबाबा
सोनिया गांधी एक लुटारू स्नुषा असल्याचा घणाघात योगगुरू रामदेवबाबा यांनी केला आहे. ही स्नुषा सासरचा पैसा माहेरी नेत आहे. देशातील भ्रष्टाचाराची जननी असलेल्या त्या एक विदेशी महिला आहेत. सोनिया सासरचा पैसा आपल्या घरी (इटली) नेत आहेत. भाजपच सोनियांची ही मोहीम रोखू शकते. जेव्हा केव्हा भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर येते तेव्हा गांधी कुटुंब आणि इटलीचे नाव येते. विदेशी महिलेस या वेळी पराभूत करणे आवश्यक आहे. उमा भारती यांनी रायबरेलीतून निवडणूक लढवावी, अशी माझी इच्छा होती, असे रामदेव म्हणाले.