लखनऊ - उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसा सत्तारुढ समाजवादी पक्षातील संघर्ष वाढत आहे. गुरुवारी मुख्यमंत्री अखिलेश यादव सैफईमध्ये विकास योजनांचे लोकार्पण करत होते. त्यादरम्यान सप अध्यक्ष शिवपाल यादव यांनी तुरुंगात कैद गुंड मुख्तार अन्सारीच्या "कौमी एकता दला'च्या विलीनीकरणाची घोषणा केली. काही दिवसांपूर्वी विलीनीकरणाची चर्चा झाली होती. मात्र, अखिलेश यांच्या आडकाठीमुळे पक्षातील दिग्गज नेत्यांना विलीनीकरणाचा निर्णय रद्द करावा लागला होता. मुख्तारवर सात व्यक्तींशिवाय भाजप अामदार कृष्णानंद राय यांच्या हत्येसह अनेक गुन्हे दाखल आहेत.
निर्णयाबाबत शिवपाल म्हणाले, नेताजींच्या (मुलायम सिंह) सांगण्यावरून कौमी एकता दलाचे विलीनीकरण झाले आहे. तिकीट वाटपावरून उद््भवलेल्या वादावर त्यांनी सांगितले की, पक्षाशी संबंधित सर्व निर्णय सप प्रमुख मुलायम सिंह मुख्यमंत्री अखिलेश यांच्या संमतीने घेतले जात आहेत. यासोबत त्यांनी सपची ८० सदस्यांची कार्यकारिणी जाहीर केली. आमचा पक्ष नेहमी दहशतवादाविरोधात आहे. दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी आम्ही मोदी सरकारसोबत आहोत. मोदी यांनी पहिल्यांदा जातीयवाद नष्ट करावा,नंतर रावण आपोआप मारला जाईल. याअाधी शिवपाल यादव अखिलेश यादव यांच्यात प्रदेशाध्यक्ष पदावरूनही मतभेद निर्माण झाले होते.
असा सुरू झाला संघर्ष
विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी कौमी एकता दलाच्या सपमधील विलीनीकरणास अखिलेश यादव यांनी विरोध केला होता. यानंतर २५ ऑगस्ट रोजी झालेल्या पक्षाच्या संसदीय बैठकीत विलीनीकरण फेटाळण्यात आले. या वादानंतर सपमध्ये कौटुंबिक कलह सुरू झाला होता.
शिवपाल यांचे स्पष्टीकरण
विलीनीकरणावरशिवपाल यादव म्हणाले, हा निर्णय मुलायम सिंह यादव यांनी घेतला आहे. यासाठी अखिलेश यांचाही सल्ला घेतला तेव्हा ते म्हणाले, नेताजींनी सांगितल्यावर विलीनीकरण झाले. हा निर्णय सर्वांच्या पाठिंब्यातून झाला आहे.