आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुमेहींना खाता येणारे तांदळाचे वाण शोधले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - छत्तीसगडच्या शास्त्रज्ञांनी तांदळाचे नवे वाण विकिसत केले आहे. मधुमेह असणारे रुग्णही हा तांदूळ सहजरीत्या खाऊ शकतील. चपटी गुरमटिया असे या तांदळाचे नाव असून त्यातील वैशिष्ट्य शोधले आहे ते रायपूरच्या इंदिरा गांधी विद्यापीठातील तज्ज्ञांनी. या तांदळात कबरेदके उशिराने पचवण्याची क्षमता असते. अशा प्रकारचे तांदळाचे वाण जगात कुठेही नाही, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

प्लांट मॉलिक्यूलर बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी विभागाचे प्रोफेसर गिरीश चंदेल यांनी सांगितले की, ‘चपटी गुरमटिया नावाचे तांदळाचे वाण छत्तीसगडमध्ये उपलब्ध असणार्‍या जुन्या वाणांपैकी एक आहे. कमी उत्पन्न व अन्य त्रुटींमुळे शेतकर्‍यांत या वाणाचे पीक घेण्याचे प्रमाण कमी आहे. परंतु ग्लायसेमिक इंडेक्सनुसार हा तांदूळ मधुमेहींसाठीही उपयुक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता मोठय़ा प्रमाणात घेतल्या जाणार्‍या स्वर्णा, एमटीयू, कर्मा मसुरी आदी तांदळांच्या वाणासोबत या तांदळाचे संकर केले जाणार आहे. त्यानंतर या तांदळाची पुन्हा एकदा चाचणी घेतली जाईल. तांदळातील ग्लायसेमिक इंडेक्स चांगला राहिला, उतार वाढला तर त्यावर पुढे संशोधन केले जाईल.’

दुर्मिळ वाणांचे जे नमुने संरक्षित केले जातात त्यांना र्जमप्लाज्म असे म्हणतात. विज्ञापीठाकडे तांदळाचे 23,000 पेक्षा जास्त र्जमप्लाज्म आहेत. त्यापैकीच एक असलेल्या चपटी गुरमटियातील ग्लायसेमिक इंडेक्स अँनालायझर मशीनद्वारे तपासण्यात आला. तेव्हा असे लक्षात आले की त्यात कबरेदके जास्त आहेत. परंतु ग्लायसेमिक इंडेक्समध्ये (जीआय)याचे युनिट 48 ते 52 आहे. इतर तांदळाच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. कर्मा मसुरी तांदळात जीआय 55 ते 60, एचएमटीमध्ये 81, तर स्वर्णामध्ये 55 ते 58 आहे.

ग्लायसेमिक इंडेक्स चाचणी यशस्वी
चपटी गुरमटिया तांदळाबाबत छत्तीसगडमध्ये असा पारंपरिक समज दृढ आहे की, या तांदळाचा भात खाल्ल्याने दीर्घ काळ भूक लागत नाही. हा तांदूळ मधुमेहींसाठी उपयुक्त आहे की नाही याबाबत आतापर्यंत काहीच शास्त्रोक्त आधार उपलब्ध नव्हता, परंतु काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातून ग्लायसेमिक इंडेक्स अँनालायझर मशीन आणून त्याद्वारे चाचणी घेण्यात आली. तेव्हा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनीही चपटी गुरमटियाच्या तांदळाच्या वेगळेपणावर पसंतीची मोहोर उमटवली.
भारतीय मसाल्यांपासून रक्तदाब निर्मूलक औषध
भारतीय वैज्ञानिकांनी मसाल्यापासून निर्मित औषधींची उंदरांवर यशस्वी चाचणी केली आहे. भारतीय स्वयंपाकात नित्याने वापर होणार्‍या मसाल्यांचा या औषधनिर्मितीत वापर करण्यात आला. उंदरांचा रक्तदाब कमी झाल्याचे चाचणीत निष्पन्न झाले. चेन्नई येथील श्रीरामचंद्रन विद्यापीठाच्या एस. तनिकाचलम यांच्या संशोधक चमूने यावर संशोधन केले. रक्तदाबाची समस्या असणार्‍यांना याचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. संशोधकांनी अद्रक , धणे, जिरे व काळी मिरीचा यात वापर केला.

(डेमो पिक)