आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: रुग्णांशी वागणूक सुधारण्यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - कोलकात्याच्या वरिष्ठ डॉक्टरने संवाद कौशल्याचा खास अभ्यासक्रम तयार केला आहे. त्यामुळे डॉक्टरांमध्ये संवेदनशीलता वाढेल, असा दावा त्यांनी केला. याशिवाय रुग्ण आणि डॉक्टरांदरम्यानचा संवाद मजबूत करून विश्वासाचे नाते निर्माण करण्यास याचा उपयोग होईल.
कोलकात्याच्या आयपीजीएमईआरचे डॉक्टर दीप्तेंद्र सरकार यांनी या अभ्यासक्रमाची आखणी केली. आयपीजीएमईआरमधून एमबीबीएस उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दीप्तेंद्र यांचा हा अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या संदर्भात सरकार यांनी माहिती दिली. आयपीजीएमईआरमध्ये आैपचारिकरीत्या गेल्या वर्षीपासून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. इंटर्नशिपच्या पूर्वी सर्व विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले.
आयपीजीएमईआरमध्ये दीप्तेंद्र सरकार ब्रेस्ट सर्व्हिसेस व रिसर्च युनिटचे प्रमुख आहेत. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटात ‘जादू की झप्पी’द्वारे रुग्णाच्या मनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवण्यात आला. हीच संकल्पना आता वैद्यकीय पदवीधरांसाठी पाश्चात्त्य देशांत लागू करण्यात आली आहे. असे अभ्यासक्रम तिकडेही आखल्याचे दीप्तेंद्र यांनी सांगितले. पदवी मिळवण्यासाठी या अभ्यासक्रमात उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. याचे ८ मॉड्यूल्स आहेत. पैकी एका मॉड्यूलमध्ये कर्करोगाच्या रुग्णांशी योग्य वर्तन करणे शिकवले जाते. दीप्तेंद्र यांनी ‘आनंद’ चित्रपटातील मरणासन्न रुग्ण आनंद (राजेश खन्ना) आणि डॉ. भास्कर (अमिताभ) यांच्या संबंधांचे या वेळी उदाहरण दिले. यात दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. एक रुग्णांना कर्करोगाचे निदान कसे कळवावे? त्यांची शेवटची स्टेज आहे हे कसे सांगावे हा मोठा प्रश्न आहे. या अभ्यासक्रमात डॉक्टरांना मलमपट्टीपासून ते बोलण्याच्या शिष्टाचारापर्यंत सर्व शिकवले जाणार आहे. गंभीर स्थितीतील रुग्णासमोर मोबाइलवर संभाषण करू नये व हसू नये, अशा छोट्या बाबीही यात शिकवल्या जातील.
डॉक्टरांचा दररोज मृत्यूशी लढा असतो. त्यामुळे त्यांचे वर्तन वेगळे होत जाते. मात्र रुग्णांचे तसे नसते. त्यामुळे मृत्यूला ते वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देतात. याची जाणीव डॉक्टरांनी ठेवली पाहिजे.
कोणताही रुग्ण स्वेच्छेने येत नाही, डॉक्टरांनी त्यांच्याशी संवेदनशीलतेने वागावे
‘डॉक्टरांनी कसे कपडे वापरावेत हेदेखील शिकवले जात आहे. समाजात कसे वावरावे, रुग्णाशी कसे बोलावे याविषयी यात विवेचन आहे. कोणीही स्वेच्छेने रुग्णालयात येत नाही. रुग्ण तणावाखाली असतो. ते सामान्य स्थितीत नसतात. त्यामुळे त्यांचे वर्तनही अस्वस्थ असते. त्यामुळे डॉक्टरांनी संवेदनशीलतेने व धीराने संवाद साधला पाहिजे.’
बातम्या आणखी आहेत...