जयपूर - दिवान-ए-खास, दिवान-ए-आम, दरबार आणि राजकोश यासारखे शब्द राजेशाहीची आठवण करून देतात. मात्र सध्या हे शब्द एका बँकेत सर्रास वापरात आहेत. राजस्थानमधील सी-स्कीम येथील स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर येथील ‘कोहिनूर रॉयल’ या शाखेत असाच राजेशाही थाट अनुभवास मिळतो. एवढेच नाही तर येथे खाते उघडण्यासाठी कमीत कमी एक कोटी रुपये लागतात.
खास गर्भश्रीमंतांसाठीच्या या शाखेची कार्यप्रणालीदेखील शाही थाटाची आहे. येथे खाते उघडण्यासाठी बँकेच्या व्यवस्थापकाकडून एक राजेशाही पत्र पाठवले जाते किंवा बँकेचा एक प्रतिनिधी दूत म्हणून ग्राहकाकडे जातो आणि बँकेत खाते उघडण्याचे औपचारिक निमंत्रण देतो. या शाखेचे महाव्यवस्थापक जे. के. दुबे सांगतात, आतापर्यंत शाखेत 100 खाती उघडण्यात आली असून 500 चे उद्दिष्ट आहे. यात क्रिकेटपटू, राजघराण्यातील सदस्य आणि एनआरआयचा समावेश आहे. बँकेत अनेक फाइव्ह स्टार सुविधांसह फॉरेक्सचीही सोय आहे. या शाही शाखेच्या उभारणीसाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
राजेशाही सजावट, पंचतारांकित सुविधा
* ड्रेसिंग रूमसुद्धा
या बँकेच्या शाखेत ‘शृंगार’ नावाची एक आकर्षक ड्रेसिंग रूमही आहे. ग्राहकाला एखाद्या पार्टीत किंवा लग्नात जायचे असल्यास त्यांनी बँकेत यायचे, लॉकरमधून दागिने काढायचे, ड्रेसिंग रूममध्ये तयार व्हायचे आणि येथूनच पार्टीसाठी रवाना व्हायचे, अशी सुविधा आहे.
* बँक नव्हे, साक्षात राजदरबाराची अनुभूती
या बँकेचे इंटेरिअर राजदरबारासारखे आहे. दिवान-ए-खास, दिवान-ए-आम, दरबार आणि राजकोष अशी बँकेची विभागणी करण्यात आले आहे. दिवान-ए-खासमध्ये प्रीमियम वेल्वेट सोफे असून तेथे बसून ग्राहकांना खाते आणि सुविधांची माहिती घेता येते. बँकेत राजपुताना, मेवाड आणि बैठक असे आणखी तीन विभाग आहेत. ग्राहकांचे खासगी आयुष्य जपण्यासाठी, त्यांच्या गरजा ओळखून कुटुंबीयांशी संवाद साधण्याकरिता व्हिडिओ चॅटिंगची सुविधाही उपलब्ध आहे. लॉकरची सुविधा आठवड्याचे सात दिवस, 24 तास असते. येथील दावत-ए-खास नावाच्या कॅफेटेरियात पंचतारांकित हॉटेलसारखा पाहुणचार होतो.